Business Idea:- सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न हा भारतासमोरील एक ज्वलंत प्रश्न असून दरवर्षी विद्यापीठांमधून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या आणि त्यामानाने उपलब्ध नोकरी यांचे प्रमाण खूपच व्यस्त असल्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.
त्यामुळे व्यवसाय उभारणी ही काळाची गरज असून त्या दृष्टिकोनातून आता अनेक तरुण-तरुणी व्यवसायाकडे वळले आहेत. तसेच अशा तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून अनुदान किंवा थेट कर्ज स्वरूपात मदत करण्यात येते
व व्यवसाय उभारणीला हातभार लागतो. याच पद्धतीने आपण या लेखामध्ये असा एक व्यवसाय पाहणार आहोत जो वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे व त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन लाख रुपये पर्यंतची मदत देखील करण्यात येते. तो व्यवसाय म्हणजे जेनेरिक औषधांचे जन औषधी केंद्र हा होय. व्यवसायाला केंद्र सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते.
जन औषधी केंद्र सुरू करा आणि चांगला नफा मिळवा
स्वस्त औषधांचा पुरवठा व्हावा याकरिता केंद्र सरकार संपूर्ण देशांमध्ये जन औषधी केंद्रांच्या संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत असून मार्च 2024 पर्यंत संपूर्ण देशामध्ये दहा हजार प्रधानमंत्री जन औषधि केंद्र उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना स्वस्तात स्वस्त औषधे मिळण्याची सोय उपलब्ध होते.
जन औषधी केंद्र उघडण्यासाठी कोणती पात्रता लागते?
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जन औषधी केंद्र उघडण्यासाठी तुमच्याकडे डी फार्मसी किंवा बी फार्मची पदवी असणे आवश्यक आहे.
2- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे अंतर्गत एसटी, एससी आणि दिव्यांग अर्जदारांना जन औषधी केंद्र उघडण्याकरिता औषध खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंतचे पेमेंट आगाऊ दिले जाते.
3- यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जन औषधी केंद्र जर तुम्हाला उघडायचे असेल तर तुम्ही ते स्वतःच्या नावाने व इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने उघडणे शक्य नाही. ते तुम्हाला प्रधानमंत्री जन औषध केंद्राच्या नावानेच उघडावे लागते.
जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी सरकारने केले आहेत तीन श्रेणी
तर तुम्हाला देखील जन औषधी केंद्र उघडायचं असेल तर त्याकरिता केंद्र सरकारने तीन श्रेणी तयार केलेले आहेत. यातील पहिल्या श्रेणीमध्ये बेरोजगार फार्मासिस्ट तसेच सामान्य माणूस, डॉक्टर किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश होतो तर दुसऱ्या श्रेणीत ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी रुग्णालय तर तिसऱ्या श्रेणीत राज्य सरकारांनी नामनिर्देशित केलेल्या एजन्सीचा समावेश होतो.
यासाठी कसा कराल अर्ज?
जर तुम्ही या करता पात्र असाल व तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जन औषधी केंद्राच्या नावाने किरकोळ औषध विक्रीचा परवाना घ्यावा लागेल. हा परवाना मिळवण्यासाठी तुम्हाला जन औषधी केंद्राची अधिकृत संकेतस्थळ https://janaushadi.gov.in/ ला भेट देऊन फॉर्म डाऊनलोड करणे गरजेचे असते. त्यानंतर तुम्हाला अर्ज ब्युरो ऑफ फार्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजरच्या नावाने पाठवावा लागेल व त्यानंतर तुम्हाला परवाना मिळतो.
या व्यवसायातून किती पैसा मिळतो?
जन औषधी केंद्रांच्या माध्यमातून औषध घेतल्यावर तुम्हाला 20% कमिशन मिळते तुम्ही वर्षाला औषधांची जी विक्री कराल त्यावर 15% पर्यंतचे प्रोत्साहन सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. तसेच या योजनेच्या अंतर्गत सरकार तुमच्या दुकानात वापरले जाणारे जे काही फर्निचर व इतर वस्तू आहेत त्याकरिता दीड लाख रुपये देते व कंप्यूटर आणि प्रिंटर खरेदीसाठी पन्नास हजार रुपये देते. अशा पद्धतीने सरकार दोन लाख रुपयांची मदत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी करत असते.