CMO Office Maharashtra : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. आजचा दिवस राज्यातील नागरिकांसाठी खूपच खास राहिला आहे. कारण की आज राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्यांसाठी नऊ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद आता व्यक्त होत आहे. खरे तर सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे लोकसभेची निवडणूक झाली की, लगेचचं राज्यात विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. परिणामी राज्यातील सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी वर्तमान सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.
एकंदरीत, आगामी लोकसभेत मतदारांना खुश करण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज 10 जानेवारी 2024 ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांची देखील हजेरी होती.
मुख्यमंत्री कार्यालयाने आजच्या या महत्त्वाच्या बैठकीत सरकारने कोणकोणते निर्णय घेतले आहेत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. सीएमओ ऑफिसने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या नवनिर्माण यांची माहिती आपल्या एक्स हँडल वरून दिली आहे. दरम्यान, आता आपण या निर्णयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय खालील प्रमाणे
1)मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
2)बैठकीत दुसरा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी देण्याचे काम मंत्रिमंडळाने केले आहे.
3)या शिवाय आजच्या या महत्त्वाच्या बैठकीत शासकीय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित केलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टीमने घेतला आहे.
4)’सत्यशोधक’ या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
5)आज जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी मिळाली आहे.
6)आजच्या बैठकीत ज्या भूमिहीन नागरिकांना घरकुल मंजूर होते मात्र त्यांना जागा नसते अशा नागरिकांसाठी देखील महत्त्वाचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात रु.५० हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय वर्तमान सरकारने घेतला आहे.
7)महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे.
8)22 जानेवारीला अयोध्या येथील भव्यदिव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा एवढा भव्यदिव्य राहणार आहे की येथे जगभरातील प्रतिष्ठित व्यक्ती आपली हजेरी लावणार आहेत. त्या दिवशी हजारोंच्या संख्येने रामभक्त अयोध्यात हजेरी लावणार आहेत. दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
9) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्यास तसेच ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.