Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. आपल्या राज्यासोबतच कापसाची लागवड राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश सह देशातील विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्राचा विचार केला असता देशात कापूस लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे.
मात्र उत्पादनाच्या बाबतीत गुजरात राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. याचा अर्थ आपल्या राज्यात कापसाचे उत्पादन आणि उत्पादकता खूपच कमी झाली आहे. कापसाची उत्पादकता कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. योग्य वाणाची निवड न होणे, पिकावर येणारे विविध रोग आणि कीटक, पावसाची कमतरता, गुलाबी बोंड आळी सारख्या घातक कीटकांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे कापसाचे उत्पादन कमी होत चालले आहे.
अशातच मात्र राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त दोन नवीन वाण विकसित करण्यात आले आहे. या नवीन वाणामुळे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यांमधील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
कापसाचे नव्याने विकसित झालेले वाण कोणते
केंद्र सरकारने केंद्रीय बियाणे समितीशी सल्लामसलत केल्यानंतर भारतातील कृषी प्रयोजनांसाठी कापसाच्या 2 नवीन जाती प्रसिद्ध केल्या आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव पंकज यादव यांनी 25 सप्टेंबर 2023 रोजी याबाबतची महत्त्वाची अशी अधिसूचना जारी केली होती.
सदर अधिसूचनेनुसार देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, दक्षिण राजस्थान आणि गुजरात या राज्यांसाठी कापसाचे नवीन वाण जारी करण्यात आले आहे. गुजरात कॉटन-46 (G. Cot-46: Sorath Sweat Hemp) आणि फुले सातपुडा (JLA -१२०७) या दोन कापसाच्या जाती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
यापैकी फुले सातपुडा हा वाण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उडीसा, दक्षिण राजस्थान आणि गुजरात या राज्यांसाठी शिफारशीत करण्यात आला आहे. तसेच गुजरात कॉटन 46 हा वाण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि ओडिशा या राज्यांसाठी शिफारशीत करण्यात आला आहे.