Cotton Market Price : यंदा बाजारात कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. म्हणून पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरू लागले आहे. दोन वर्षांपूर्वी कापसाला बाजारात दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला होता.
पण गेल्या हंगामात बाजारभाव कमी झालेत. यंदा मात्र कमी पावसामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. यामुळे बाजारात मालाला चांगला दर मिळणार असे शेतकऱ्यांना वाटत होते.
पण हंगामाची सुरुवातचं शेतकऱ्यांसाठी निराशाजनक राहिली. बाजारात हंगामाच्या सुरुवातीला चांगला भाव मिळाला नाही. विजयादशमीला कापसाचा नवीन हंगाम सुरू झाला. हंगामाची सुरुवात झाली तेव्हा राज्यातील बहुतांशी बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला.
तर काही ठिकाणी हमीभावाच्या आसपास बाजार भाव स्थिरावले. मध्यंतरी बाजारभावात थोडीशी वाढ झाली होती. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यंतरी कापसाला सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाला होता.
पण हा बाजारभाव जास्त काळ टिकू शकला नाही आणि आता पुन्हा एकदा बाजारभाव दबावात आले आहेत. कापसाला सरासरी 6800 ते 7200 पर्यंतचा दर मिळत आहे.
विशेष म्हणजे कमाल बाजारभाव देखील 7000 रुपये प्रति क्विंटल पासून ते 7200 रुपये प्रति क्विंटल यादरम्यानचं आहेत.यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.
असाच भाव कायम राहिला तर पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.मात्र काल अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात थोडीशी वाढ नमूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, अकोला बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काल 13 डिसेंबर 2023 रोजी कापसाला किमान 7550 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे.
तसेच या बाजारात काल कापसाला किमान 5000 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 6275 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला होता. तथापि कमाल बाजार भावात थोडीशी वाढ झालेली असली तरी देखील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत नाहीये.
पिकासाठी आलेला वाढीव उत्पादन खर्च पाहता कापसाला किमान आठ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला पाहिजे अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.