Cotton Rate Maharashtra : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप आहे. या पिकातून तात्काळ पैसे मिळत असल्याने याला नगदी पिकाचा दर्जा दिला जातो. पण अलीकडे हे नगदी पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. कापसाला पांढर सोनं म्हणून ओळखले जाते.
मात्र हे पिक उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना अलीकडे खूपच अधिकचा खर्च करावा लागत आहे. कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती, वाढलेले इंधनाचे दर आणि वाढलेली शेतमजुरी या सर्व पार्श्वभूमीवर कापूस उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा अधिकचा खर्च करावा लागत आहे.
या अशा विपरीत परिस्थितीमध्ये देखील राज्यातील बहुतांशी शेतकरी कापसाची लागवड करतात. मात्र उत्पादित झालेल्या मालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. गेल्या हंगामात देखील कापसाला अपेक्षित असा दर मिळाला नव्हता.
दरम्यान या चालू हंगामात पावसाच्या कमतरतेमुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होईल असा दावा केला जात आहे. पण उत्पादन घटणार असे सांगितले जात असले तरी देखील कापसाला यंदा दहा हजारापर्यंतचा भाव मिळणार नाही असे बाजार अभ्यासकांचे म्हणणे आहे.
खरंतर दोन वर्षांपूर्वी कापूस दहा हजार रुपये प्रति क्विंटल ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकले गेले होते. काही ठिकाणी तर याहीपेक्षा अधिकचा भाव गेल्या दोन वर्षांपूर्वी मिळाला होता. पण गेल्यावर्षी कापसाला खूपच कमी दर मिळाला. या चालू हंगामातही नवीन कापसाचे बाजारात आवक होत आहे, पण बाजार भाव अजूनही दबावातच आहेत.
शेतमाल बाजार अभ्यासाकांनी सांगितल्याप्रमाणे यंदा कापसाचा जागतिक व्यापार आणि बाजारातील मंदी यामुळे बाजार भाव दबावात राहतील. जागतिक मंदी आली असल्याने दरवाढीची शक्यता मावळली असल्याचे मत तज्ञांनी वर्तवले आहे. परंतु कापसाचे बाजार भाव हे काही प्रमाणात सरकीच्या बाजारभावावर देखील विसंबून राहणार आहेत.
यामुळे आता सरकीला मागणी वाढली आणि सरकीच्या दरात वाढ झाली तर कदाचित भविष्यात कापूस दर सुधारू शकतात असा आशावाद व्यक्त होत आहे. केंद्र शासनाने लॉंग स्टेपल कापसाला सात हजार वीस रुपये आणि मध्यम स्टेपलं कापसाला 6620 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे.
तसेच सध्या कापूस बाजारात 7000 ते 7300 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला जात आहे. म्हणजेच सध्या काही ठिकाणी हमीभावापेक्षा अधिक दर कापसाला मिळत आहे. परंतु शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये एवढा भाव मिळावा अशी आशा आहे.
पण यंदा दहा हजारापर्यंतचा भाव मिळणार नाही, पण 7200 रुपये प्रति क्विंटल च्या दरम्यान बाजारभाव स्थिरावतील असा अंदाज काही तज्ञांच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे. कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक गोविंद वैराळे यांनी लोकमतला सांगितले की, यंदा कापसाला सरासरी सात हजार दोनशे रुपये प्रतिक्विंकलच्या आसपास भाव मिळू शकतो.