Dragon Fruit Farming Ahmednagar : शेती परवडत नाही, नैसर्गिक संकटांमुळे आता शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा बनला आहे, अस आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो. काही अंशी हे खरे देखील आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट आणि सोबतच दुष्काळ या सर्व विपरीत परिस्थितीमुळे शेतीमधून फारसे उत्पादन मिळत नाही.
शिवाय उत्पादित केलेल्या शेतीमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. यामुळे नैसर्गिक संकटांमुळे आणि सुलतानी दडपशाहीमुळे बेजार झालेले शेतकरी आता शेती नको रे बाबा असा ओरड करू लागले आहेत. पण जर सुयोग्य नियोजन आणि पीक लागवडीत काळानुरूप बदल केले तर शेतीचा व्यवसाय हा परवडतो.
अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने हे दाखवून दिले आहे. पारंपारिक पिकांच्या कचाट्यात अडकून राहण्यापेक्षा काहीतरी नवीन केले पाहिजे या हेतूने जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुट लागवडीचा प्रयोग करून एकरी पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे.
यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याच्या ड्रॅगन फ्रुट लागवडीचा हा प्रयोग पंचक्रोशीत चांगला चर्चेचा विषय ठरला आहे. चांदेकसारे-सोनेवाडी गावातल्या गौरव कोऱ्हाळकर या प्रगतिशील शेतकऱ्याने हा ड्रॅगन फ्रुट लागवडीचा नवीन प्रयोग केला आहे.
गौरव यांचे बीएससी ऍग्री पर्यंतचे शिक्षण झाले आहे. बीएससी ऍग्री नंतर त्यांना निश्चितच चांगली नोकरी मिळणार होती. मात्र नोकरी मागे न धावता त्यांनी काळ्या आईशी इमान राखला आणि शेती करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्याकडे 14 एकर शेती असून यामध्ये ते प्रामुख्याने उसाची शेती करतात. मात्र या पारंपारिक पिकाला बगल देऊन काहीतरी नवीन करण्याचे त्यांनी ठरवले. मग त्यांनी 2021 मध्ये आपल्या दोन एकर जमिनीत ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.
जम्बो रेड जातीचे ड्रॅगन फ्रुट दहा बाय दोन या अंतरावर लावले. डेंस सिंगल बार पद्धतीने त्यांनी ड्रॅगन फ्रुट लावले. लागवडीनंतर अवघ्या 14 महिन्यांच्या काळात ड्रॅगन फ्रुटला लालचटक फळे लागली. पण पहिल्यांदा फळे कमी येतात. दुसऱ्या वर्षापासून मात्र फळांचे उत्पादन वाढत जाते.
गौरव सांगतात की या पिकाची विशेषता म्हणजे याला कोणतेच रासायनिक खत वापरावे लागत नाही. फक्त कूजलेलं शेणखत आणि पाणी एवढेच द्यावे लागते. फक्त वर्षातून एक-दोनदा एम 45 सारख्या सर्वसाधारण बुरशीनाशकाचे फवारणी करावी लागते.
म्हणजेच कमी खर्चात यातून उत्पादन मिळते. या पिकाला पाणी देखील खूपच कमी लागते. परिणामी ड्रॅगन फ्रुट ची शेती गौरव यांच्यासाठी फायदेशीर ठरली आहे. सध्या त्यांच्या शेतात सात हजार ड्रॅगन फ्रुट ची रोपे आहेत. दोन एकरात लावलेल्या या प्लॉटमधून त्यांना एकरी तीन ते चार टन एवढे उत्पादन मिळत आहे.
नोव्हेंबर मध्ये मालाला 100 ते 160 रुपये एवढा भाव मिळाला आहे. यामुळे त्यांना एकरी चार ते पाच लाखांपर्यंतची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे त्यांना दरवर्षी एवढीच कमाई यातून होत आहे. निश्चितच गौरव यांचा हा प्रयोग इतरांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे.