Dragon Fruit Farming : गेल्या काही दशकांमध्ये भारतातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग राबवले आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून कमी संसाधनांमधूनही देशातील शेतकऱ्यांनी लाखोंची कमाई करून दाखवली आहे. नैसर्गिक आपत्तीवर यशस्वीरीत्या मात करून देशातील शेतकऱ्यांनी आता शेतीला फायदेशीर व्यवसाय बनवला आहे.
दरम्यान तेलंगाना राज्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये अभिनव प्रयोग करत लाखोंची कमाई करून दाखवली आहे. तेलंगणा मधील संगारेड्डी जिल्ह्यातील रमेश रेड्डी यांनी ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून दरवर्षी 12 ते 15 लाखांचा नफा कमवून दाखवला आहे. यामुळे सध्या रेडी यांची देशभर चर्चा आहे.
रेड्डी फक्त सीझनमध्येच ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतात असे नाही तर ऑफ सीजन मध्ये देखील त्यांनी या फळाची यशस्वी शेती करून दाखवली आहे. ऑफ सीजनमध्ये त्यांनी LED लाईटच्या मदतीने या पिकाची शेती यशस्वी केली आहे.
रमेश यांनी सांगितल्याप्रमाणे या फळाचा हंगाम हा जून ते नोव्हेंबर दरम्यान असतो. सीझनमध्ये ड्रॅगन फ्रुटला शंभर रुपये प्रति किलोचा भाव मिळतो मात्र ऑफ सीजन मध्ये या फळाला तब्बल 200 ते 300 रुपये प्रति किलो असा दर मिळतो.
अर्थातच ऑफ सीजन मध्ये या पिकाची शेती करून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. रमेश सांगतात की त्यांनी 2016 मध्ये दोन एकरात पहिल्यांदा लागवड केली. सुरुवातीला दोन एकरात लागवड केली त्यावेळी त्यांना प्रति एकर पाच लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. आता त्यांच्याकडे सात एकराचा ड्रॅगन फ्रुटचा प्लॉट आहे. यामध्ये त्यांनी 80 प्रकारचे ड्रॅगन फ्रुट लावले आहेत.
त्यांनी एलईडी लाईट लावली असून यासाठी त्यांना प्रति एकर दोन लाख रुपये खर्च आला आहे. 9 ते 15 वॉटचे एलईडी लाईट लावले आहेत. या पिकाची एक विशेषतः अशी की याला खूपच कमी पाणी लागते. यामुळे ज्या भागात कमी पाणी आहे तेथील भागातील शेतकऱ्यांसाठी हे पीक फायदेशीर ठरत आहे.
रमेश ठिबक सिंचनाद्वारे तीन दिवसात एकदा पाणी देतात. झाडाला चार ते पाच लिटर एवढे पाणी दिले जाते. या पिकाच्या उत्पादनासाठी दरवर्षी 50 हजार रुपयांचा प्रति एकरासाठी खर्च येतो. तज्ञ सांगतात की या पिकासाठी प्रकाश खूप महत्त्वाचा आहे. यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाशासोबतच रात्री चार तास प्रकाश दिला जातो.
एलईडी लाईट वापरल्यास ऑफ सीजनमध्ये देखील फळांचा आकार वाढतो. ऑफ सीजनमध्ये उत्पादन कमी मिळते मात्र फळांचा दर्जा आणि चव तशीच राहते. शिवाय ऑफ सीझनमध्ये फळाला चांगला भाव मिळतो. यामुळे रमेशने ऑफ सीजनमध्ये या पिकाची शेती सुरू केली असून त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळत आहे.
रमेशने ड्रॅगन फ्रुटच्या इतर उत्पादनावर देखील भर दिला आहे. त्यांनी यापासून वाईन बनवली आहे. सध्या या व्यवसायासाठी रमेश कागदोपत्री काम करत आहेत. येत्या काही दिवसात त्यांचा हा व्यवसाय सुरू होणार आहे. रमेश सांगतात की यापासून फक्त वाईनच बनवली जाते असे नाही तर जॅम, जेरी तसेच इतर ब्युटी प्रॉडक्ट देखील बनवले जाऊ शकतात.
एकंदरीत ड्रॅगन फ्रुटचे प्रत्यक्ष उत्पादन तर मिळतेच मात्र अशा प्रकारचे प्रॉडक्ट तयार करूनही शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा सोर्स उपलब्ध होतो. विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रुटचे झाडे 25 ते 30 वर्षे टिकतात म्हणजेच एकदा लागवड केली की सतत 30 वर्षांपर्यंत शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. निश्चितच तेलंगानाच्या या अवलिया शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटची लागवड करून आणि या शेतीत अभिनव प्रयोग स्वीकारून इतरांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे.