Edible Oil Prices : गेल्या काही वर्षांमध्ये इंधनाचे दर, खाद्यतेलाचे दर मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. भाजीपाल्याच्या किमती देखील आकाशाला गवसणी घालत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी वाढत चालली आहे. परिणामी आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महागाई एक मुख्य मुद्दा राहण्याची शक्यता आहे.
जाणकार लोकांनी महागाईमुळे केंद्रातील मोदी सरकारला निवडणुकांमध्ये फटका बसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. एप्रिल-मे 2024 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
अशा परीस्थितीत सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्यात. याव्यतिरिक्त सर्वसामान्यांना स्वस्तात डाळ, तांदूळ आणि गव्हाचे पीठ उपलब्ध करून दिले जात आहे.
एवढेच नाही तर खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी देखील शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यामुळे गेल्या एका महिन्यात खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत.
सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात होत आहे. याशिवाय भुईमूग आणि सोयाबीन यांसारख्या तेलबिया पिकांचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे.
शिवाय सण-उत्सवाचा हंगाम देखील आता उलटला आहे. यामुळे खाद्य तेलाच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होऊ लागला आहे. याचा परिणाम म्हणून खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत.
गेल्या महिन्याभरात शेंगदाणा तेलाच्या 15 kg च्या डब्याची किंमत चारशे रुपयाने घसरली असल्याची माहिती समोर आली आहे. एका वर्षभरात शेंगदाणे तेलाचे दर पंधरा ते पंचवीस रुपये प्रति किलो एवढे कमी झाले आहेत.
विशेष म्हणजे सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाचे दर देखील कमी झाले आहेत. तसेच जाणकार लोकांनी आगामी काळात खाद्यतेलाच्या किंमती अजून कमी होतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात सोयाबीन तेलाचा 15 kg चा डब्बा १५७५ रुपये, सुर्यफुल तेलाच्या 15 किलो डब्याची किंमत १५५५ रुपये, तर शेंगदाणा तेलाची 15 kg डब्ब्याची किंमत २७३० रुपये एवढी आहे.