Farmer Scheme : केंद्र आणि राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. राज्यातही निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या शेतीशी निगडित आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीशी निगडित व्यक्तींसाठी केंद्र अन राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना चालवल्या जात आहेत. दरम्यान आता आपण शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असलेल्या केंद्राच्या आणि राज्याच्या 4 शेतकरी योजनांची माहिती जाणून घेणार आहोत.
पीएम किसान सन्मान निधी योजना : या योजनेची सुरुवात मोदी सरकारने केली आहे. ही योजना 2019 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना ट्रान्सफर केले जातात.
दर चार महिन्यांनी एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण होत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 16 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. या योजनेचा सतरावा हप्ता हा लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता आहे.
नमो शेतकरी योजना : नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली स्कीम आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे.
पी एम किसान योजनेप्रमाणेच या योजनेचे ही निकष आहेत. पी एम किसान अंतर्गत जो लाभ मिळत आहे तोच लाभ नमो शेतकरी अंतर्गत ही दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेचे तीन हफ्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत.
पीएम किसान मानधन योजना : देशभरातील शेतकऱ्यांना उतार वयात पेन्शन उपलब्ध व्हावी यासाठी या योजनेची सुरुवात झाली आहे. पीएम किसान मानधन योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये आणि वर्षाला 36,000 रुपयांची पेन्शन दिली जात आहे.
पण या योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधी शेतकऱ्यांना काही पैसे गुंतवावे लागतात. ही एक ऐच्छिक योजना आहे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत नाही. जें शेतकरी या योजनेत सहभागी होतील आणि या योजनेत गुंतवणूक करतील त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.
जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत ते पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळालेल्या हप्त्यातून त्यांच्या प्रीमियमची रक्कम देखील कपात करू शकतात. अशाप्रकारे शेतकरी कोणताही पैसा खर्च न करता या योजनेचा मोफत लाभ घेऊ शकतात.
पीएम कुसुम योजना : या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. या अंतर्गत सौर पंपावर 60 टक्के अनुदान दिले जाते. यातुन शेतकऱ्यांना सौर पंप बसवून 24 तास सिंचनाची सुविधा मिळू शकते. सौर पंपावर सबसिडी व्यतिरिक्त, तुम्ही बँकेकडून 30 टक्के कर्ज देखील मिळवू शकता. अशा परिस्थितीत शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत केवळ 10 टक्के रक्कम खर्च करून शेतकरी आपल्या शेतात सौरपंप बसवून वीज बिल कमी करू शकतात.