नादखुळा ! युवा शेतकऱ्याने अडीच एकर केळी बागेतून मिळवला 15 लाखांचा नफा, कसं केल नियोजन ? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशाच्या निम्म्याहून अधिक जनसंख्येचा शेती हा व्यवसाय मुख्य उपजीविकेचे साधन आहे. जवळपास 50 ते 60 टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहेत. मात्र असे असतानाही देशातील शेतकरी बांधवांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे.

अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट तर कधी दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना अनेकदा शेतीमधून म्हणावे तसे उत्पादन मिळत नाही. तर अनेकदा उत्पादित झालेल्या मालाला चांगला भाव मिळत नाही. या अशा परिस्थितीत शेतकरी बांधव कर्जबाजारी होत असल्याचे हृदय विदारक दृश्य पहावयास मिळत आहे.

यामुळे शेतकरी आत्महत्येचा आलेख देखील वाढतच चालला आहे. परंतु अशा या बिकट परिस्थितीमध्ये देखील काही शेतकऱ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील असेच एक उत्तम उदाहरण सेट केले आहे.

जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे महाळुंगे येथील युवा शेतकऱ्याने केळीच्या बागेतून लाखोंची कमाई करून दाखवली आहे. अमन मुलानी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अमन यांनी केळीच्या पिकाच्या फक्त अडीच एकर जमिनीतून तब्बल 15 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

यामुळे सध्या अमन यांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. खरंतर अमन स्वतः कृषी विषयात पदवीधर आहेत. त्यांनी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतीतच करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे.

अमन यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी डिसेंबर 2022 मध्ये अडीच एकर जमिनीत केळीची लागवड केली. केळी लागवड करण्यासाठी मात्र त्यांना सुरुवातीला केळीची रोपे मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. केळीची रोपे बाजारात तब्बल 16 ते 17 रुपये प्रति नग या प्रमाणे मिळत होते.

यामुळे केळी लागवडीसाठी अधिकचा खर्च लागणार असे वाटतं होते. पण त्याचवेळी त्यांना मुंबई येथील मयंक गांधी यांनी सुरू केलेल्या ग्लोबल विकास ट्रस्ट या संस्थेबाबत माहिती मिळाली. येथे त्यांना केळीची रोपे फक्त सात रुपये प्रति नग याप्रमाणे मिळाली. दरम्यान, त्यांनी केळीची अडीच एकरात तीन हजार रोपे लावली. आता त्यांनी लागवड केलेल्या केळीतून उत्पादन मिळू लागले आहे.

सध्या अमन यांच्या केळी बागेत हार्वेस्टिंग सुरू आहे. विशेष म्हणजे त्यांनी उत्पादित केलेली केळी इराक या आखाती देशांमध्ये निर्यात होत आहे. त्यांना अडीच एकरातून तब्बल 55 टन केळीचे उत्पादन मिळण्याची आशा असून त्यांच्या केळीला 27 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे.

यामुळे अडीच एकर जमिनीतून जवळपास 15 लाखांपर्यंतचे उत्पन्न त्यांना मिळेल असे सांगितले जात आहे. निश्चितच अमन यांनी शेतीत केलेली ही कामगिरी इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे यात शंकाच नाही.

Leave a Comment