Farmer Success Story : बहुतांशी नवयुवकांचे उच्च शिक्षणानंतर एखाद्या चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी लागावी असे स्वप्न असते. पण शिक्षणानंतर शेती करणारे फारच कमी आहेत.
विशेष म्हणजे निसर्गाच्या लहरीपणाचा आणि शासनाच्या उदासीन धोरणाचा शेतीला फटका बसत असल्याने आता शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले देखील शिक्षणानंतर नोकरीच बरी असा सूर आवळु लागले आहेत.
पण आज आपण सोलापूर जिल्ह्यातील अशा एका तरुणाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ कंपनीत काम केले आणि त्यानंतर शेती सुरू केली आहे.
विशेष म्हणजे या मेकॅनिकल इंजिनियरने शेतीमध्ये देखील एक भन्नाट मेकॅनिझम वापरले असून शेतीमध्ये एक नवीन प्रयोग केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मेकॅनिकल इंजिनियर तरुणाने चक्क स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आहे. स्ट्रॉबेरी हे पीक थंड हवामानात येते.
हे पीक महाबळेश्वर आणि पाचगणी सारख्या थंड ठिकाणी मोठ्या प्रमाणात पायाला मिळते. मात्र करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील चेतन निंबाळकर या मेकॅनिकल इंजिनियरने करमाळा सारख्या उष्ण हवामानात देखील स्ट्रॉबेरी चे यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले आहे.
निंबाळकर यांनी सांगितल्याप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यात नोकरी सुरू केली होती. नोकरी चांगली मजेत सुरू होती मात्र अशातच कोरोना आला आणि लॉकडाऊन लागले. यामुळे त्यांना गावाकडे यावे लागले. गावाकडे आल्यानंतर त्यांनी मग शेतीत रमण्याचा निर्णय घेतला.
गेल्या दोन वर्षात त्यांनी ऊस, केळी यांसारख्या नगदी पिकांमधून चांगले उत्पादन मिळवले आहे. यावर्षी मात्र त्यांनी बाजाराचा अभ्यास करत स्ट्रॉबेरी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली.
20 गुंठे जमिनीत त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून लागवडीनंतर योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना स्ट्रॉबेरी पिकातून चांगले उत्पादन मिळणार आहे. पीक लागवडीनंतर तीन महिन्यांच्या काळात हार्वेस्टिंग सुरू झाली असून शेवटपर्यंत त्यांना यातून चार टन एवढा माल निघण्याची आशा आहे.
विशेष म्हणजे सध्या स्ट्रॉबेरीला 400 रुपये प्रति किलो पर्यंतचा भाव मिळत आहे. असाच बाजार भाव कायम राहिला तर त्यांना यातून सात लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे.
निश्चितच, नोकरी गेल्यानंतर हताश न होता शेती करण्याचा घेतलेला निर्णय आणि यातून मिळवलेले लाखो रुपयांचे उत्पन्न निंबाळकर यांचा आत्मविश्वास वाढवत आहे. तसेच त्यांचा हा प्रयोग इतर तरुणांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.