Farmer Success Story:- आजकालचे उच्चशिक्षित तरुण नोकऱ्या नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांकडे सध्या वळताना आपल्याला दिसून येत आहे. त्यातल्या त्यात जर आपण शेतीसंबंधीत असलेल्या व्यवसायांचा विचार केला तर शेतीमध्ये अनेक उच्चशिक्षित तरुण सध्या येऊ लागले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे प्रकारचे पिकांची लागवड करून उच्चशिक्षित तरुण फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.
त्यातल्या त्यात शेती सोबतच शेतीशी असलेले जोडधंदे देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक दृष्टिकोनातून केले जात असून यातून देखील तरुण प्रचंड प्रमाणात नफा मिळवत आहेत. याच मुद्द्याला धरून जर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे या गावच्या निलेश गोसावी या बीई टेली कम्युनिकेशन मध्ये शिक्षण झालेल्या तरुणाचा विचार केला तर या तरुणांनी देखील ससे पालन या व्यवसायाची निवड केली व या माध्यमातून लाखो नफा मिळवत आहे. याच तरुणाची यशोगाथा आपण बघणार आहोत.
ससे पालनातून कमवत आहे लाखोंचा नफा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे या छोट्याशा गावातील निलेश गोसावी या तरुणाने बंदिस्त ससे पालन व्यवसाय सुरू केलेला आहे. विशेष म्हणजे निलेश यांनी टेली कम्युनिकेशनमध्ये बीई केलेले असून खाजगी कंपनीमध्ये ते सध्या नोकरी देखील करत आहेत.
परंतु नोकरी करत असताना एखादा व्यवसाय करावा या विचारात असताना पारंपारिक असलेले शेळीपालन किंवा पशुपालन या व्यतिरिक्त काहीतरी नवा व्यवसाय सुरू करावा अशी निलेशची इच्छा होती. या नवीन व्यवसायाच्या शोधात असताना ससे पालन हा व्यवसायाचा पर्याय निलेश यांच्यासमोर आला व त्यांनी ससे पालनाची निवड केली.
ससा हा प्राणी कोकणाच्या या वातावरणामध्ये चांगला वाढू शकतो हे निलेश यांच्या लक्षात आले व त्यांनी हरियाणा येथे यासंबंधीचे प्रशिक्षण घेऊन ससा पालन व्यवसाय सुरू केला. यासाठी हरियाणा मधूनच निलेश यांनी दोन ससे आणले व या माध्यमातून हा व्यवसाय यशस्वी केला.
सध्या या व्यवसायाला दोन वर्षे पूर्ण झालेली असून सध्या अडीचशे ते तीनशे ससे निलेश यांच्या फार्ममध्ये आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने न्यूझीलंड व्हाईट, सोव्हेज चिंचेला, कॅलिफोर्निया, ग्रे जॉईंट, ब्लॅक जॉईंट आणि डच या जातींचे ससे प्रामुख्याने पाळले आहे.
तसेच यामध्ये अगोरोरा ही फक्त केसांसाठी प्रसिद्ध असलेली विशिष्ट सशांच्या जातीचे देखील पालन केले आहे. या सशांना गुजरात आणि गोवा राज्यात मोठी मागणी असून मुंबई आणि पुण्यामध्ये देखील चांगली मागणी आहे.
ससा विक्रीला कसा तयार होतो?
ससा हा पाळण्यासाठी तसेच मांस आणि प्रयोग शाळेत त्यांचा वापर केला जातो. सशांमध्ये प्रौढ सशांचे वजन दोन ते अडीच किलो पर्यंत असते.
जेव्हा सशाची पिल्ले जन्माला येतात तेव्हा ते 60 ते 70 ग्रॅम चे असतात. टप्प्याटप्प्याने त्यांच्या वजनात वाढ होत जाते व एका महिन्यात ससा पाचशे ते सहाशे ग्रॅम एवढ्या वजनाचा होतो व दोन महिन्यांमध्ये 900 ते 1000 किलोग्रॅम वजनाचा होतो. साधारणपणे तीन महिन्याच्या कालावधीत सशाचे वजन 1500 ग्राम होते व तीन महिन्यापासून सशाची विक्री करता येते.
ससे विक्रीतून लाखोंचा नफा
सशांची बाजारपेठ महाराष्ट्रात देखील आहे व इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहे. लॅबकरिता ज्या सशांचा वापर केला जातो त्यांची विक्री प्रामुख्याने पुणे शहरात होते व मांसासाठी यांची विक्री गुजरात राज्यामध्ये केली जाते. निलेश यांनी एक आठवड्याला पाचशे सशाची विक्री देखील केलेली आहे. ससे पालनातून निलेश गोसावी यांना वर्षाला 10 ते 12 लाख रुपयांचा फायदा होत आहे.
या पद्धतीने उच्चशिक्षित असून देखील ससे पालनातून निलेश गोसावी यांनी दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली आहे.