Farmer Success Story : महाराष्ट्र हे एक शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. तथापि, अलीकडे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले नवयुवक तरुण शेतीमध्ये सातत्याने वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत असल्याने आणि शेतीमधून मिळणारे उत्पन्न वर्षानुवर्ष कमी होत चालल्याने आता शेतीपासून दुरावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शेतीमधून फारशी कमाई होत नसल्याने आता शेतकरी पुत्रांची शेतीपेक्षा नोकरीच बरी अशी धारणा बनली आहे. पण जर शेतीमध्ये योग्य नियोजन केले आणि नियोजनाला कष्टाचे सांगड घातली तर शेतीतुन लाखो रुपये उत्पन्न मिळू शकते हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. खरंतर पश्चिम महाराष्ट्र अन मराठवाडा हे दोन विभाग ऊस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात.
इतरही विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. ऊस हे राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. अलीकडे मात्र हे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. हवामान बदलामुळे उसापासून अपेक्षित असे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत नाही. कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती, वाढलेले मजुरीचे दर, इंधनाच्या वाढत्या किमती या सर्व पार्श्वभूमीवर आता उसाचे पीक शेतकऱ्यांना परवडत नाहीये.
अशा या विपरीत परिस्थितीमध्ये मात्र बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि सोनकसवाडी येथील शेतकरी आणि व्यवसायाने वकील असलेले एडवोकेट संजय यशवंत जगताप यांनी उसाच्या पिकातून विक्रमी उत्पादन मिळवले आहे. जगताप यांनी उसापासून एकरी 138 टन एवढे दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. ऊस पिकातून विक्रमी उत्पादन मिळवले असल्याने जगताप यांची सध्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.
विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील जगताप यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे. दस्तूर खुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जगताप यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली असल्याने जगताप यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. दरम्यान आता आपण जगताप यांनी उसाचे विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी कसं नियोजन केलं होतं, उसाच्या कोणत्या जातीची निवड केली होती याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या वाणाची निवड केली, कसं केलं नियोजन?
जगताप यांनी सांगितल्याप्रमाणे केळी पिकाची हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ऊस लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी सर्वप्रथम त्यांनी उसाच्या सुधारित वाणाची निवड केली. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथून त्यांनी को – 86032 जातीच्या उसाच बेणं आणलं आणि आपल्या शेतात लागवड केली. सात फूट अंतरावर सरी पाडून रोपांमध्ये सुमारे दीड फुटाचे अंतर ठेवून त्यांनी 4200 उसाच्या रोपांची लागवड केली.
रोपांची लागवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या परिवारासमवेत पिकाची योग्य जोपासना केली. पीक चांगले जोमदार बहरले पाहिजे यासाठी योग्य खतांचा वापर केला. पाणी व विद्राव्य खतासाठी ठिबक सिंचनाचा वापर झाला. रासायनिक खतांचा देखील तज्ञांच्या सल्ल्याने संतुलित प्रमाणात वापर त्यांनी केला होता. यामुळे उसाचे चांगली जोमदार वाढ झाली आणि त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले आहे.
पीक दहा ते बारा आणि 20 ते 22 कांड्यांवर आल्यानंतर त्यांनी पाचट काढून घेतले. यामुळे त्यांचे उसाचे पीक 45 ते 50 काड्यांचे बनले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांचे जगताप यांना मोलाचे मार्गदर्शन अन सहकार्य लाभले आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी देखील त्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले आहे. वास्तविक जगताप हे व्यवसायाने वकील आहेत. पुण्यात ते वकिली करतात.
निष्णात कायदेतज्ञ असतानाही त्यांनी शेतीची आपली आवड यशस्वीरित्या जोपासून दाखवली आहे. जगताप यांनी उसाच्या शेतीत साधलेली ही किमया माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना देखील भुरळ पाडून गेली आहे. पवार यांनी स्वतः जगताप यांच्या बांधावर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या कार्याची पवार यांनी प्रशंसा केली आहे. जगताप यांनी सांगितले की, माळेगाव कारखान्याने सभासदांना प्रतिटन 3411 रुपये एवढा दर दिला आहे.
यामुळे 138 टन उसासाठी 4 लाख 83 हजार रुपये एवढे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. त्यांना पिकासाठी आलेला सर्व खर्च वगळता सुमारे साडेतीन लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. निश्चितच जगताप यांनी आपला वकिली व्यवसाय सांभाळून शेतीमध्ये साधलेली ही कामगिरी इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे.