Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य अन्नधान्य पीक आहे. या पिकाची शेती ही रब्बी हंगामामध्ये केली जाते. गव्हाची पेरणी प्रामुख्याने नोव्हेंबर महिन्यात होते.
तथापि, ज्या शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये याची पेरणी करता येत नाही ते शेतकरी डिसेंबर महिन्यात याची पेरणी करतात. दरम्यान देशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नववर्षाच्या आधीच एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे देशातील शेतकऱ्यांसाठी भारतीय वैज्ञानिकांनी गव्हाची एक नवीन जात विकसित केली आहे. मध्यप्रदेश येथील जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय जबलपूर येथील वैज्ञानिकांनी गव्हाचा हा नवीन वाण विकसित केला आहे.
खरेतर कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाच्या सुधारित जातीची शेती करणे आवश्यक असते. गव्हाच्या बाबतीतही असेच काहीसे आहे. गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्याच्या सुधारित वाणाची पेरणी करणे आवश्यक असते.
यामुळे शेतकऱ्यांसाठी जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय जबलपूर येथील वैज्ञानिकांनी गव्हाची नवीन जात विकसित केली आहे. या नवीन जातीला एमपी 1378 असे नाव देण्यात आले आहे. जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय जबलपूर अंतर्गत येणाऱ्या विभागीय कृषी संशोधन केंद्र पावरखेडा येथे गव्हाचा हा नवीन वाण तयार करण्यात आला आहे.
गव्हाच्या या नव्याने विकसित झालेल्या जातीपासून विक्रमी उत्पादन मिळवता येणार आहे. तेच म्हणजे या नव्याने विकसित झालेल्या जातीत झिंक आणि आयरन मुबलक प्रमाणात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जातीमध्ये लोहाचे आणि झिकचे प्रमाण 40 PPM एवढे आहे. विशेष बाब अशी की हा वान भुरा आणि काळा तांबेरा रोगासाठी देखील प्रतिकारक आहे.
सामान्य जातींपेक्षा या जातीची उत्पादनक्षमता दहा टक्के अधिक आहे. हा वाण कमी उंचीचा आणि रोगप्रतिरोधक आहे. यामध्ये भरपूर पोषक घटक आहेत. बिस्कीट आणि ब्रेड साठी या जातीचे गहू उत्कृष्ट राहणार आहेत. या जातीच्या पिकाची उंची 88cm पर्यंत जात आहे आणि पिक कालावधी 120 दिवसांचा आहे. या जातीपासून 66 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.