Maharshtra Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. लग्नसराईचा आणि लोकसभा निवडणुकीचा देखील काळ सुरू आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर अनेकजण आपल्या मूळ गावाकडे परतत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यामुळे सध्या एस टी महामंडळाच्या लालपरीमध्ये आणि रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान, याच अडचणींचा विचार करता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर देखील अनेक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते थीवीदरम्यान देखील विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. पण सध्या ही गाडी आठवड्यातून फक्त एक दिवस धावत आहे.
अर्थातच ही गाडी साप्ताहिक म्हणून धावत आहे. मात्र आता ही विशेष गाडी आठवड्यातुन तीन दिवस धावणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने माहिती दिली आहे. याबाबतचे अधिकृत परिपत्रक देखील कोकण रेल्वेच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते थिविम दरम्यान दिनांक 13 मे ते ५ जून 2024 या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस चालवली जाणार आहे. सोमवार, बुधवार आणि शनिवारी ही ट्रेन राजधानी मुंबई येथील एलटीटी रेल्वे स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.
थीवी ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर ही गाडी दि. 14 मे ते 6 जून 2024 या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. ही ट्रेन थिविम येथून मंगळवार, गुरुवार आणि रविवारी चालवली जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे.
मुंबई ते कोकण आणि कोकण ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांना या गाडीमुळे मोठा फायदा होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे. निश्चितच उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने
या विशेष एक्सप्रेस ट्रेनची वारंवारता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने याचा फायदा कोकणातील चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून यामुळे प्रवाशांचा प्रवास हा वेगवान होईल अशी आशा आहे.