Government Employee News : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. भारतीय निवडणूक आयोग लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असे बोलले जात आहे. हेच कारण आहे की, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मतदारांना खुश करण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सरकारने कामाचा सपाटा सुरु केला आहे. मंत्रालयातील ज्या फाईली गेल्या काही वर्षांपासून धुळ खात पडलेल्या होत्या त्या देखील आता पुढे सरकल्या आहेत. एकंदरीत आगामी निवडणुकीसाठी आत्तापासूनच पडघम वाजत आहेत.
याच पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता.
आता, मात्र यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच महागाई भत्ता 50% एवढा झाला आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार हे विशेष. याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात जो पगार मिळेल त्यासोबत दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हा लाभ जानेवारी महिन्यापासून लागू होणार असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देखील सदर कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. याशिवाय महागाई भत्ता 50% झाल्यानंतर घर भाडे भत्ता सुधारित करण्याचे प्रावधान सरकारने घातले आहे.
यामुळे आता घरभाडे भत्ता देखील एक टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. कर्मचारी राहत असलेल्या शहरानुसार त्यांना HRA मिळतोय. यासाठी शहरांचे वर्गीकरण तीन श्रेणीमध्ये करण्यात आले आहे.
एक्स, वाय आणि झेड अशा या तीन श्रेणी आहेत. आतापर्यंत या तिन्ही श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27, 18 आणि 9 टक्के एवढा HRA दिला जात होता. जेव्हा महागाई भत्ता 25% होता तेव्हापासून एवढाच घरभाडे भत्ता कर्मचाऱ्यांना मिळतोय. आता मात्र यामध्ये अनुक्रमे तीन, दोन आणि एक टक्के एवढी वाढ झाली आहे.
म्हणजे आता X कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 30%, Y कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 20% आणि Z कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 10 टक्के एवढा महागाई भत्ता मिळणार आहे. अशातच सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एलआयसीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने नुकताच घेतला आहे.
मोदी सरकारने एलआयसीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये 17 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे एलआयसीच्या एक लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून 30,000 पेन्शन धारकांना देखील या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेष म्हणजे ऑगस्ट 2023 पासून पगारवाढ लागू राहणार आहे. अर्थातच, सदर कर्मचाऱ्यांना पगारांमधील फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे. यासाठी वार्षिक 4 हजार करोड रुपयांचा अतिरिक्त खर्च शासनाला करावा लागणार आहे. निश्चितच, या निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.