Government Employee News : जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातुन, मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांबाबत एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय ऑल इंडिया सर्विसेस मधील अर्थातच अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आला आहे. या अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सुट्ट्यांबाबतच्या नियमांमध्ये आता बदल झाला असून हे संबंधित कर्मचारी आता त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात तब्बल 730 दिवसांची पगारी रजा घेऊ शकणार आहेत.
ही पगारी रजा मोठ्या मुलांच्या संगोपनासाठी दिली जाणार आहे. याबाबत डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगने नुकतीच एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बालसंगोपन रजेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
ही सुधारणा देशभरातील राज्य सरकारांना विचारात घेऊन करण्यात आली आहे. त्यानुसार आता देशभरातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांना 730 दिवसांची बालसंगोपन रजा मिळणार आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण सेवा काळात मिळणार आहे.
मुलं 18 वर्षे होण्यापूर्वी या अंतर्गत मुलांची काळजी घेण्यासाठी, त्यांचे संगोपन करण्यासाठी रजा घेता येणाऱ आहे. विशेष म्हणजे या अंतर्गत पहिल्या 365 दिवसांसाठी ज्या रजा मंजूर होतील त्या शंभर टक्के पगारावर राहतील.
मात्र दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच दुसऱ्या 365 दिवसांसाठी ज्या रजा मंजूर होतील त्या 80% पगार देऊन मंजूर केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या बालसंगोपन रजेसाठी स्वतंत्र खाते तयार केले जाणार आहे. म्हणजेच इतर सुट्ट्यांमध्ये या सुट्ट्या एकत्रित होणार नाहीत.
निश्चितच हा केंद्र शासनाचा निर्णय अखिल भारतीय सेवेतील पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे आपल्या मुलांसाठीच्या जबाबदाऱ्या या संबंधित कर्मचाऱ्यांना चोखपणे पार पाडता येणार आहेत, असे मत कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.