Government Employee News : भारतात नुकताच नवरात्र उत्सव साजरा झाला आहे. नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा सण मोठ्या आनंदात पार पडला आहे. या सणाला देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देखील मिळाली आहे. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के एवढा वाढवला आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.
आधी महागाई भत्ता हा 42% एवढा होता. पण यामध्ये चार टक्के वाढ करण्यात आली असून आता महागाई भत्ता 46 टक्के एवढा झाला आहे. याचा लाभ पुढील महिन्याच्या पगारांसोबत दिला जाणार असून संबंधितांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय देखील नुकताच घेण्यात आला आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसात सरकारी नोकरदारांची चांदी झाली आहे. विशेष बाब अशी की, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच राज्य शासनात कार्यरत असलेल्या 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील लवकरच वाढवला जाईल असे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या पूर्वीच शिंदे सरकार राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा सण गोड होणार असा आशावाद व्यक्त होत आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांचा संदर्भात आणखी एक महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे.
आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाची भेट देणार आहे. वास्तविक दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करणे अपेक्षित आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू करण्यात आला होता.
यानुसार आता नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग हा 2026 पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणे अपेक्षित आहे. दरम्यान आठवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी नवीन वेतन आयोगाच्या समितीचे गठन होणार आहे. या समितीची स्थापना 2024 मध्ये केली जाईल असे वृत्त समोर आले आहे.
पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका राहणार असल्याने शासन सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना येत्या नवीन वर्षात करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल झाला तर त्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा फिटमेन्ट फॅक्टर 2.57 पट एवढा असून यामध्ये 3.68 पर्यंत वाढ होणार आहे.
यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 8000 रुपयांनी वाढणार आहे तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 6000 रुपयांपर्यंत वाढेल असे सांगितले जात आहे.
सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 18000 रुपये एवढा आहे मात्र नवीन वेतन आयोगानुसार हा किमान मूळ पगार 26000 पर्यंत वाढेल. तसेच, राज्य कर्मचाऱ्यांचा सध्याचा असलेला किमान मूळ पगार 15000 रुपयांवरून 21 हजार रुपये एवढा होईल असे सांगितले जात आहे.
यामुळे जर केंद्र शासनाने पुढील वर्षी आठवा वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली तर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळणार असल्याचे चित्र तयार होणार आहे.