Havaman Andaj 2023 : सध्या भारतात दिवाळीचा आनंददायी पर्व साजरा केला जात आहे. नऊ तारखेपासून सुरू झालेला हा पर्व 15 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान या आनंददायी पर्वात अवकाळी पावसाने विरजण घातल आहे.
अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे.
या अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे तर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झाले आहे.
तर हा सध्याचा अवकाळी पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरेल असेही मत काही जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात आणखी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुढील 24 तासात राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे अरबी समुद्रातील ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहणार आहे. यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे. पण आता थंडीचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा गुलाबी थंडीची चाहूल लागणार आहे.
आयएमडीने सांगितल्याप्रमाणे, राज्यात आता या चालू महिन्याच्या शेवटी अर्थातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे यंदा जोरदार थंडी डिसेंबर मध्येच अनुभवायला मिळेल असा अंदाज आहे.
IMD ने सांगितल्याप्रमाणे, आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागातील रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.