Havaman Andaj 2023 : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात वारंवार बदल पाहायला मिळत आहे. देशातील काही भागांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. विशेषतः भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असल्याचे चित्र आहे.
तर दुसरीकडे भारताच्या दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये अजूनही अवकाळी पावसाचा त्राहीमाम पाहायला मिळत आहे. म्हणजे देशात सध्या समिश्र वातावरण आहे.
आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातही गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. राज्यात या चालू महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची शेती पीक वाया गेलीत. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आता मात्र महाराष्ट्रात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे आणि ढगाळ हवामान देखील पूर्णपणे निवळले आहे.
शिवाय आता राज्यात हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला आहे. उत्तरेकडील काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने आणि थंडीची लाट आली असल्याने याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रात गारठा वाढू लागला आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या निफाड मध्ये किमान तापमान 11.3°c पर्यंत खाली आले आहे.
दुसरीकडे विदर्भातही बहुतांशी जिल्ह्यामध्ये किमान तापमान 14 अंशापर्यंत खाली आले आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी भागांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे.
कपाटात पॅक करून ठेवलेले स्वेटर आता हळूहळू बाहेर निघू लागले आहे. मात्र राज्यातील दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये अजूनही थंडीचा जोर वाढलेला नाही. त्या ठिकाणी अजूनही थंडीची वाट पाहिली जात आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने आगामी काही तास दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तामिळनाडूला पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याचा अर्थ येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कन्याकुमारी, तिरुन्नेलवेल्ली, थूथकुडी आणि तेनकसी या जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.