Havaman Andaj : येत्या दोन दिवसात ऑगस्ट महिना संपेल. याबरोबरच मान्सूनचा तीन महिन्यांचा काळ देखील संपणार आहे. पण या तीन महिन्यांच्या काळात दोन महिने महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. या चालू ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा 56% कमी पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्यात देखील अशीच परिस्थिती होती. मात्र गेल्या जुलै महिन्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता. जुलै महिन्यातील पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. पण या चालू महिन्यात पावसाचा खूप मोठा खंड पडला असल्याने खरीप हंगामातील पिकांनी आता माना टेकल्या आहेत.
पिकांना आता जोरदार पावसाची गरज आहे. विशेष म्हणजे राज्यातील धरणे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची शक्यता काही जाणकार लोकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसासाठी देव नवसले जात आहेत. देवाकडे पावसासाठी विनवणी केली जात आहे.
पावसाची बिकट बनत चाललेली परिस्थिती पाहता आता महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. याव्यतिरिक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी सरकारकडे केली आहे.
दुष्काळाचे हे सावट सप्टेंबर महिन्यात तरी दूर व्हावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने 29 ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात कसे हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे.
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण देशाचा विचार केला असता उत्तर प्रदेश व राजस्थान वगळता उर्वरित सर्व राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे उत्तर भारतात, पश्चिमी चक्रवात तर मध्य भारतात पुन्हा पश्चिम वाऱ्याची ताकद वाढत आहे.
याचा परिणाम म्हणून राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. हवामानातील या बदलामुळे आज 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात या कालावधीमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राला मोठ्या पावसासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते.