Havaman Andaj July 2024 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने अक्षरशः उघडीप दिली आहे. तसंच काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. गेल्या जून महिन्यात ही राज्यात कमी पाऊस झाला आहे. शिवाय आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगल्या पावसाची शक्यता असतानाही अजून जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून सर्वत्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अशातच आता हवामान खात्याच्या माध्यमातून गुड न्यूज समोर आली आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. मान्सून सक्रिय झाल्यापासून कोकण आणि घाटमाथा परिसरावर संततधार पाऊस सुरू आहे.
विशेष म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात देखील पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून आज राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार असा अंदाज आयएमडी कडून समोर आला आहे. खरे तर गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.
तथापि कोकण आणि घाटमाथा परिसरावर जूनमध्ये चांगला पाऊस होत होता. एक-दोन वेळा या भागात तर अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि घाटमाथा परिसरावरील जोरही कमी झाला आहे. या भागातील पावसाचा जोर जून महिन्याच्या अखेरीस ओसरला तो आजही ओसरलेला आहे.
पण आज भारतीय हवामान खात्याने कोकण आणि घाटमाथा परिसरावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
कोण-कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील या तिन्ही जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील या संबंधित जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11, नंदुरबार वगळता खानदेश मधील दोन जिल्हे, परभणी आणि हिंगोली हे दोन जिल्हे सोडून मराठवाड्यातील उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.