Havaman Andaj Maharashtra : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाळी वातावरणाची अनुभूती येत आहे. राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी देखील लागली आहे.
अवकाळी पावसामुळे अन पावसाळी वातावरणामुळे सध्या महाराष्ट्रातील गारठा किंचित कमी झाला आहे. राज्यातील अनेक भागातून थंडी जणू काही गायबच झाली आहे. यामुळे लोकांनी आता स्वेटर बाजूला ठेवले असून पुन्हा एकदा छत्र्या बाहेर काढल्या आहेत.
पावसाचा हा लहरीपणा मात्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा या शेती पिकांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे आणि आता पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झाला असल्याने या पिकांचे आणखी नुकसान होईल अशी भीती व्यक्त होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन कापूस आणि तूर या मुख्य पिकांच्या उत्पादनात जवळपास निम्म्याने घट आली आहे.
निदान आता रब्बी हंगामातून तरी बऱ्यापैकी उत्पादन मिळेल अशी अशा शेतकऱ्यांना होती मात्र कमी पावसामुळे आणि आता सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि पावसाळी वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाच्या उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
अशातच जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
कसं राहणार आगामी पाच दिवसाच हवामान
हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आगामी चार ते पाच दिवस महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाच्या गडगडाटी अवकाळी पावसाची शक्यता आहे. असे हवामान 10 जानेवारी 2024 पर्यंत कायम राहणार आहे.
यामुळे हे पावसाळी हवामान निवळल्यानंतर पुन्हा हवामान पूर्वपदावर येईल आणि राज्यात कारखा वाढेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे खुळे यांनी येत्या दोन दिवसात अर्थातच 9 जानेवारी 2024 ला खानदेश अर्थातच धुळे, नंदुरबार, जळगाव हा परिसर आणि त्या लगतचा अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर सोबतच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक राहणार असे नमूद केले आहे.
एवढेच नाही तर खुळे यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार खान्देश विभागातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर या तालुक्याच्या तुरळक भागात किरकोळ गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाहीये. यामुळे आता खुळे यांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.