Havaman Andaj September : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याचे चित्र आहे. राज्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. काल अर्थातच 16 सप्टेंबर 2023 ला राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये काल पावसाची नोंद करण्यात आली आहे. काही भागात चांगला जोरदार पाऊस झाला आहे तर काही भागात पावसाची रिपरिप पाहायला मिळाली आहे. मात्र शेतकऱ्यांना आणखी मोठ्या पावसाची आतुरता लागून आहे.
हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आज देखील भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उर्वरित राज्यात मात्र आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्थातच आज पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि कोकणातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार नाही. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे तर उर्वरित महाराष्ट्रात पुन्हा पावसाची प्रतीक्षा राहणार आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज कोकणातील उत्तर भागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यात आज मोठा पाऊस पडण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय आज कोकणातील दक्षिण भागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त आज खानदेशातील नंदूरबार तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.