Gold Buying Rule : उद्या अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीयाचा. आपल्याकडे अक्षय तृतीयाला सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे.
हिंदू सनातन धर्मात अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केले पाहिजे अशी रीत आहे. या दिवशी सोने खरेदी केल्यास भरभराट होते, समृद्धी नांदते असा हिंदू सनातनी लोकांचा विश्वास आहे. यामुळे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीचा आलेख वाढत असतो.
याहीवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाणार आहे. सोने खरेदी गुंतवणुकीसाठी देखील होते. अनेकजण चांगला परतावा मिळत असल्याने सोन्यात पैसे गुंतवत असतात. दरम्यान आज आपण सोने खरेदीच्या एका महत्त्वाच्या नियमाबाबत जाणून घेणार आहोत.
यामुळे जर तुम्हीही उद्या सोने खरेदीसाठी ज्वेलर्सच्या दुकानावर जाणार असाल तर ज्वेलर्सच्या दुकानाची पायरी चढण्याआधी आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.
खरेतर आपल्या भारतात एका ठराविक रकमेपेक्षा जास्तीचे सोने खरेदी करण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान आज आपण किती रुपयांचे सोने खरेदी करण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यावे लागते याबाबत आयकर विभागाचे काय नियम आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत.
काय आहेत आयकर विभागाचे नियम ?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर कायद्याच्या कलम 269 ST मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, एका दिवसात 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोखीच्या व्यवहारांवर बंदी आहे. म्हणजे जर तुम्ही एकाच दिवसात 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने रोखीने खरेदी केलेत तर तुम्ही आयकर कायद्याचे उल्लंघन करणार आहात. आयकर कायद्याच्या कलम 271 D मध्ये देखील या संदर्भात महत्त्वाची तरतूद आहे.
या आयकर कायद्याच्या कलमानुसार रोखीने व्यवहार केलेल्या रकमेवर दंड भरावा लागतो. यामुळे, 2 लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड अनिवार्य राहणार आहे. म्हणजे दोन लाख रुपयांपेक्षा कमीचे सोने खरेदी करण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागणार नाही.
दुसरीकडे जर एखादा ज्वेलर्स एखाद्या ग्राहकाकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम कॅशने स्वीकारत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जर एखाद्या ग्राहकाने तीन लाख रुपयांचे सोने खरेदी केले आणि ही रक्कम त्याने पॅनचा पुरावा न देता दिली तर ज्वेलर्स वर दंडात्मक कारवाई होऊ शकते आणि त्याला तीन लाख रुपयांचा दंड द्यावा लागू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर नियम, 1962 च्या नियम 114B अंतर्गत, 2 लाख आणि त्याहून अधिक किमतीच्या व्यवहारांसाठी सोने खरेदीसाठी पॅन पुरावा देणे बंधनकारक आहे. पॅन पुरावा दिल्यास दंडात्मक कारवाई होत नाही.
तुम्ही २ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोने खरेदी केले तर ज्वेलर्सला पॅन तपशील देणे अनिवार्य आहे. तुम्ही कॅशने पेमेंट केले असो किंवा ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केलेलं असो तुम्हाला दोन लाख रुपयांपेक्षा जास्तीचे सोने खरेदी करण्यासाठी पॅन पुरावा द्यावा लागणार आहे.