Maharashtra Railway News : पुणे आणि मुंबई मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
खरे तर राज्याच्या राजधानीतून सांस्कृतिक राजधानीला ये-जा करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. पुणे ते मुंबई या दरम्यान कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे. वीकेंडला तर ही संख्या आणखी वाढते. दरम्यान, आज पुणे ते मुंबई दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे रेल्वे विभागातील शिवाजीनगर-खडकी स्थानकादरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी रेल्वेने दोन दिवसांचा ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे या मार्गावरील एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोबतच पुण्यातील लोकलच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे ते लोणावळा दरम्यानच्या लोकलच्या फेऱ्या या कामानिमित्त रद्द करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत लोकल चालवली जाणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. यानंतर मात्र या मार्गावर पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने गाड्या धावणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा या मार्गावरील गाड्या पूर्वपदावर येणार आहेत.
तथापि या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर या मार्गांवरील अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आज 26 नोव्हेंबर 2023 रोजी या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यामुळे साहजिकच मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज थोडासा गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. ऐन वीकेंडला घेतलेल्या या ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. तथापि या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी ज्यादा बसेस चालवल्या जाणार आहेत.
एसटी महामंडळाकडून पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावरून ज्यादा बसेस चालवल्या जातील अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. यामुळे निश्चितच पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.