India Expressway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हेच कारण आहे की भारताचे महामार्गांचे जाळे हे अमेरिका आणि चीन नंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते नेटवर्क म्हणून विकसित झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात अनेक महामार्ग तयार झाले आहेत. तसेच अजूनही अनेक महामार्गाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.
दरम्यान, 2024 अखेरपर्यंत भारतातील सध्या स्थितीला काम सुरू असलेल्या तीन महामार्गांचे लोकार्पण होण्याची आशा आहे. अशा परिस्थितीत आता आपण या चालू वर्षअखेरपर्यंत कोणते तीन नवीन महामार्ग सुरू होतील, यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या महामार्गांचा समावेश आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुंबई-दिल्ली महामार्ग : भारतात विकसित होत असलेल्या महामार्गांमध्ये हा सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग राज्य राजधानी मुंबई आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली यांना जोडणार आहे. या महामार्गाची लांबी 1350 किलोमीटर एवढी राहणार असून हा सहा राज्यांमधून जाणार आहे. हा मार्ग सध्या आठ पदरी आहे मात्र भविष्यात हा मार्ग बारा पदरी बनवला जाऊ शकतो.
या मार्गामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त आणि फक्त बारा तासात पूर्ण होण्याची अशी आहे. सध्या मुंबई ते दिल्ली या प्रवासासाठी प्रवाशांना 24 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हा महामार्ग तयार केला जात असून यासाठी एक लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हा महामार्ग 2024 अखेरपर्यंत पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. आतापर्यंत या मार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यापैकी 600 किलोमीटर लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे.
2022 अखेरीस समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला होता. यानंतर शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
हा टप्पा गेल्या वर्षी सुरु झाला होता. आता या चालू महिन्यात भरवीर ते इगतपुरी यादरम्यान चा पंचवीस किलोमीटर लांबीचा तिसरा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या 25 किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते येत्या सोमवारी अर्थातच उद्या चार मार्च 2024 रोजी संपन्न होणार आहे.
म्हणजेच उद्यापासून समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचे तीन टप्पे सर्वसामान्यांच्या सेवेत येणार आहेत. विशेष म्हणजे या महामार्गाचा बाकी राहिलेला ७६ किलोमीटर लांबीचा इगतपुरी ते आमने पर्यंतचा चौथा टप्पा देखील लवकरात लवकर वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाचे आहे.
दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेस-वे : हा महामार्ग 650 किलोमीटर लांबीचा आहे. हा केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचे काम या वर्षातच पूर्ण होईल आणि हा संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होणार अशी आशा आहे. दिल्लीतील बहौरगढ ते जम्मू-काश्मीरमधील कटरापर्यंत हा महामार्ग विकसित होत आहे.
या एक्स्प्रेस वेवर ट्रॉमा सेंटर, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, मनोरंजन सुविधा, वाहतूक पोलीस, बस बे, ट्रक स्टॉप आणि रेस्टॉरंट्स यासारख्या उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील. हा चार पदरी महामार्ग भविष्यात आठ पदरी बनवला जाऊ शकतो. या महामार्गाच्या कामासाठी 25000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या महामार्गाचे काम करत आहे.