Indian Railway : भारतात सार्वजनिक वाहतुकीत रेल्वेचे मोठं नाव आहे. प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला विशेष पसंती दाखवतात. आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित असतो तसेच गतिमान असतो. सोबतच रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे.
यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देखील रेल्वेलाच पसंती दाखवली जाते. दरम्यान भारतीय रेल्वे देखील रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देते. काही रेल्वे प्रवाशांना तिकीट दरात सवलतही उपलब्ध करून दिली जात आहे. यात कोरोना काळापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जात होती.
म्हणजे रेल्वेमध्ये अर्ध्या तिकीटातच जेष्ठ नागरिकांना प्रवास करता येत होता. मात्र कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रेल्वेने अनेक सवलती बंद केल्या. यात ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी तिकीट दरातील 50% ची सवलतही बंद करण्यात आली. आता कोरोनाचे संकट संपले आहे.
यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी ही सवलत पुन्हा एकदा सुरू व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे. यासाठी भारतीय रेल्वेकडे अनेकांनी पाठपुरावा सुरू केला आहे. रेल्वेला यासाठी लेखी विनंती अर्ज देखील देण्यात आलेत. परंतु रेल्वेला कोट्यावधीचा तोटा आला असल्याने ही सवलत पुन्हा सुरू होणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
परंतु रेल्वेच्या या निर्णयामुळे कोट्यावधी ज्येष्ठ नागरिक नाराज असल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर यासाठी एका अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली. दरम्यान या समितीने ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा 50% तिकीट दरात सवलत दिली पाहिजे, अशी सूचना दिली असल्याचे सांगितले जात आहे. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिलेला नाही.
मात्र बंद झालेली ही सवलत पुन्हा एकदा सुरू होऊ शकते असे संकेत मिळू लागले आहेत. ही शक्यता नाकारता येत नाही असे काही रेल्वे अधिकारी देखील नमूद करत आहेत. यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा रेल्वेच्या तिकीट दरात 50% पर्यंतची सवलत मिळेल असे सांगितले जाऊ लागले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रेल्वे प्रवासात आधी 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पुरुषांना तिकिटात 40% सवलत दिली जात होती तसेच 58 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना 50 टक्के सवलत दिली जात होती. दरम्यान आता ही सवलत पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना लागू होणार असे चित्र तयार होत आहे.