Jowar Farming : सध्या देशात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. खरिपातील सोयाबीन समवेतच कापूस, मका, मूग या पिकांची काढणी सध्या प्रगतीपथावर आहे. पावसाच्या कमतरतेमुळे मात्र खरीपातुन शेतकऱ्यांना खूपच कमी उत्पादन मिळत असल्याचे चित्र आहे.
विशेषतः सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान येत्या काही दिवसात रब्बी हंगामातील पीक पेरणीला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामामध्ये यावर्षी ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाने भरड धान्य उत्पादनाला चालना दिली असल्याने यंदा रब्बी हंगामात ज्वारी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एक ते दोन पाणी भरण्यासाठी पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी यंदा ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी करतील असे सांगितले जात आहे.
ज्वारीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना धान्याचे उत्पादन तर मिळणारच आहे शिवाय ज्वारीचा कडबा देखील शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणार आहे. तसेच यावर्षी चाऱ्याची भीषण टंचाई भासू शकते यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी लागवड शेतकऱ्यांना दुहेरी हेतूने फायदेशीर ठरेल. अशा परिस्थितीत आता आपण रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारीच्या कुठल्या वाणाची पेरणी केली पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
ज्वारीच्या या सुधारित वाणाची पेरणी करा
एके एस व्ही १३ आर हे ज्वारीचे सरळ वाण रब्बी हंगामासाठी उत्कृष्ट आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या वाणाच्या लागवडीत वाढ झाली आहे. हा वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राने विकसित केला आहे.
ही जात मालदांडी 35-1 या वाणाला चांगला पर्याय ठरते. हा एक मध्यम कालावधीत जवळपास 120 ते 122 दिवसात परिपक्व होणारा वाण आहे. या जातीची मध्यम ते भारी जमिनीत लागवड करता येते. या जातीपासून 25 ते 30 प्रति हेक्टर एवढे धान्याचे उत्पादन मिळते आणि 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्टर एवढे चाऱ्याचे उत्पादन मिळते.
ही जात खोडकीड, खोडमाशी व कडा करपा या कीड, रोगासाठी बऱ्याच प्रमाणात प्रतिकारक असल्याचा दावा केला जातो. यामुळे या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. राज्यात या जातीचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.