Kamakhya Devi Temple Maharashtra : आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कामाख्या देवीचे भव्य मंदिर आहे. या ठिकाणी देशभरातून तसेच जगभरातून भाविक दर्शनासाठी जातात. महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात भाविक कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जातात. पौराणिक ग्रंथात अशी आख्यायिका आहे की, महादेव देवी सतीच्या मृत्यूनंतर खूपच व्याकुळ होते.
त्यांनी देवी सतीचे मृत शरीर आपल्या हातात उचलून तांडव केले. मात्र हे सृष्टीसाठी खूपच घातक होते. महादेवांचे तिसरे नेत्र खुलले होते. यामुळे महादेवांचा क्रोध शांत करण्यासाठी देवी सतीच्या शरीराचे भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्राने 51 भाग केले. हे भाग पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडलेत त्या ठिकाणी शक्तीपीठ तयार झालेत.
आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत. दरम्यान गुवाहाटी येथे असलेले कामाख्या देवीचे हे तीर्थक्षेत्र देखील यापैकीच एक शक्तिपीठ आहे. यामुळे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक दरवर्षी आसाम येथील गुवाहाटीला भेट देतात. पण आता गुवाहाटी येथे वसलेली कामाख्या देवी आपल्या महाराष्ट्रात देखील विराजमान होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या धारणगाव खडक येथे देशातील दुसरे कामाख्या देवीचे मंदिर स्थापित होत आहे. नासिक येथील धारणगाव खडक येथे कामाख्या देवीचे मंदिर उभारण्याचे कारण म्हणजे गणेश महाराज जगताप. मिळालेल्या माहितीनुसार सिद्ध माँ कामाख्या चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश महाराज जगताप यांना देवी सतीने एक दृष्टांत दिला.
यामध्ये देवी सतीने महाराजजी यांना या ठिकाणी मंदिर उभारण्याचे आदेशित केले. त्यानुसार हे मंदिर या ठिकाणी विकसित होत आहे. दरम्यान, या मंदिराबाबत एक महत्त्वाची माहिती आमच्या हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या मंदिराचे बांधकाम हे जवळपास पूर्ण करण्यात आले आहे. आता हे मंदिर ऑगस्ट महिन्यात भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील भाविक भक्तांना कामाख्या देवीचे दर्शन धारणगाव खडक या ठिकाणी देखील घेता येणार आहे.
कसं आहे मंदिर?
धारणगाव खडक येथे विकसित होत असलेले हे मंदिर तब्बल सव्वा एकर जमिनीवर उभारले जात आहे. या मंदिराला 111 खांब आहेत. 21 कळस आहेत त्यापैकी तीन कळस हे सोन्याचे राहणार आहेत. मंदिरचे बांधकाम पश्चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील तब्बल 250 कारागिरांच्या माध्यमातून विकसित केले जात आहे.
यासाठी जवळपास 55 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तीन सोन्याच्या कळसांपैकी पहिल्या कळसाखाली कामाख्या देवीचे मंदिर आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यात हे मंदिर भाविकांसाठी खुले होणार असून या मंदिरात होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा हा अकरा दिवस चालणार आहे.