Kunbi Caste Certificate : गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला होता. पाटील दोनदा आमरण उपोषणासाठी बसले होते. मात्र शासनाने सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन पाटील यांना दोन्ही वेळा उपोषण सोडायला भाग पाडले.
यानंतर मात्र जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथून मोर्चा काढत थेट मुंबईमधील आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पायी मोर्चा काढला होता. यात मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झालेत. वाशी नवी मुंबई येथे हा मोर्चा पोहोचला आणि सरकार बॅकफूटवर आले.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वाशी येथे पोहोचल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी एका दिवसाचा अवधी दिला. शासनाने मनोज जोरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात आणि याची अधिसूचना देखील काढली.
यानुसार आता मराठा समाजातील कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या सगे-सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. शासनाने सांगितल्याप्रमाणे, आत्तापर्यंत महाराष्ट्रात 37 लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.
यामुळे मराठा समाजातील अनेकांना आता कुणबी जात प्रमाणपत्र काढता येणार आहे. दरम्यान आता आपण कुणबी नोंद आढळून आल्यानंतर जात प्रमाणपत्र कसे काढावे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुणबी नोंद कुठं शोधणार ?
जर तुम्हाला कुणबी जात प्रमाणपत्र काढायचे असेल तर यासाठी कुणबी नोंद शोधायची आहे. तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही शाळेच्या TC वर, प्रवेश निर्गम उताऱ्यावर, किंवा खासऱ्यावर ही नोंद सहजतेने शोधू शकता. तसेच इतर अनेक कागदपत्रे आहेत, ज्यात ही नोंद सापडू शकते. जुना सातबारा उतारा, गाव नमुना नंबर 8 इत्यादी कागदपत्रांवरील कुणबी नोंद ग्राह्य धरली जाणार आहे. मात्र कागदपत्रावर असणारी नोंद ही 1967 च्या पूर्वीची असावी.
कुणबी कास्ट सर्टिफिकेटसाठी कोणती कागदपत्रे लागतात
खरंतर कोणत्याही प्रवर्गातील अर्जदार असला तरी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी सारखीच कागदपत्रे सादर करावी लागतात. फक्त कुणबी जात प्रमाणपत्रासाठी 1967 पूर्वीच्या कागदपत्रांवर कुणबी नोंद असल्याचा पुरावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुणबी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी वंशावळ, अर्जदाराचा रहिवासी दाखला, जात स्वयंघोषणा प्रमाणपत्र, शाळेचा दाखला (TC) किंवा बोनाफाईड, अर्जदाराचे आधारकार्ड, अर्जदाराचे पासपोर्ट फोटो, रेशनकार्ड, जुना सातबारा उतारा, खासरा प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदीचा पुरावा (1967 पूर्वीचा), कुटुंबातील व्यक्तीचे जात प्रमाणपत्र (बंधनकारक नाही), कुणबी नोंद (1967 च्या पूर्वीची नोंद) ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
अर्ज कसा करावा लागणार ?
कुणबी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करायचा आहे. अर्ज करताना वर सांगितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. एकदा तहसील कार्यालयात अर्ज सादर झाला की याची पडताळणी प्रांत अधिकारी यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.
अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जर सादर केलेली सर्व कागदपत्रे यथायोग्य असतील तर सदर अर्जदार व्यक्तीला कुणबी कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदर व्यक्तीला ओबीसी कोट्या मधून आरक्षण मिळणार आहे.