Loksabha Election : आगामी वर्षात असताना 2024 मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शिवाय राज्यात विधानसभा निवडणुकीचा देखील बिगुल वाजणार आहे. एप्रिल 2024 ते में 2024 या कालावधीमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होतील अशी माहिती समोर येत आहे. एकंदरीत आता लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे आता सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.
निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजत आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. शिवाय विरोधकांनी देखील पुढील निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकवण्यासाठी आत्तापासूनच मोहीम हाती घेतली आहे.
राजकीय नेत्यांनी आगामी निवडणुकांमध्ये चांगली चमकदार कामगिरी करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. विविध ठिकाणी राजकीय नेत्यांचे कार्यक्रम आयोजित होऊ लागले आहेत. राजकीय नेत्यांचे संपूर्ण देशभर दौरे पाहायला मिळत आहेत.
दरम्यान आता राज्यासह संपूर्ण देशभरातील राजकीय नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक मोठी खेळी खेळली आहे. राजकीय नेते आता देशातील प्रमुख अध्यात्मिक गुरूंना आणि कीर्तनकारांना बोलावून त्यांचे कथा आणि कीर्तन आयोजित करत आहेत.
राज्यातील राजकीय नेते इंदुरीकर महाराज, रामराव ढोक महाराज तसेच प्रमुख कथाकार पंडित मिश्रा आणि वीरेंद्र शास्त्री यांना कीर्तनासाठी आणि कथावाचनासाठी बोलावत आहेत. विशेष म्हणजे आगामी वर्षात या कीर्तनकार महाराज आणि कथावाचक महाराजांच्या कार्यक्रमात दुपटीने भर पडली आहे.
या कथावाचक आणि कीर्तनकार लोकांना राजकीय नेत्यांकडून मोठ्या तारखा मिळू लागल्या आहेत. याबाबत दिव्य मराठी या वृत्तसंस्थेने एक वृत्त प्रकाशित केले आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्रात इंदुरीकर महाराजांचे 730 कीर्तन होणार आहेत.
म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या या कालावधीत सर्वच तारखा बुक असून दररोज दोन कीर्तन होणार आहेत. याशिवाय रामराव महाराज ढोक यांची देखील डिसेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत 710 कीर्तने होणार आहेत. विशेष म्हणजे या 710 पैकी 670 कीर्तने राजकीय नेत्यांनी की आयोजित केले आहेत.
ही माहिती ढोक महाराजांच्या कार्यालयाकडूनच प्राप्त झाली आहे. यासोबतच महाराष्ट्रात पंडित मिश्रा आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या दहा ते अकरा कथा आयोजित केल्या जाणार आहेत. पंडित मिश्रा यांच्या निवडणुकीच्या वर्षात एकूण 70 कथा होणार आहेत. आधी पंडित मिश्रा यांच्या वर्षाला 50 कथा होत.
म्हणजेच निवडणुकीच्या काळात कथेची संख्या 20 ने वाढली आहे. तर धिरेंद्र शास्त्री यांच्या एकूण कथा 80 ने वाढून 160 वर गेल्या आहेत. एकंदरीत, निवडणुकीमध्ये हिंदुना साधण्यासाठी राजकीय नेत्यांनी ही एक मोठी खेळी खेळली आहे. पण याचा काही फायदा होतो की नाही हे निवडणुकीनंतरच समजणार आहे.