Maharashtra Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी आपल्या परिवारासमवेत शेत-शिवारात राबत असल्याचे पाहायला मिळतं. राज्यातील अनेक भागात खरीप पिकांची काढणी पूर्ण झाली आहे आणि रब्बीला सुरुवात झाली आहे. खरीपातील शेतमालाची विक्री देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू झाली आहे. सोयाबीन आणि कापसाचा नवीन माल बाजारात येऊ लागला आहे.
पण यंदा कमी पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचे अपेक्षित असे उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेले नाहीये. शिवाय बाजारात कापूस आणि सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आधीच उत्पादन कमी आणि आता बाजारभाव देखील मनासारखा मिळत नसल्याने शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आले आहेत.
अशातच मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेंतर्गत विमा कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी महत्त्वाची सूचना दिली आहे.
त्यामुळे दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि सणासुदीमध्ये त्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सहा जिल्ह्यांमधील जवळपास 13 लाख शेतकऱ्यांना आता 630 कोटी रुपयांची पिक विमा नुकसान भरपाईची 25% अग्रीम मिळणार आहे.
ही रक्कम येत्या चार दिवसात शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते अशी माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. सोबतच इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत आगामी तीन ते चार दिवसात निर्णय होईल अशी माहिती समोर येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, धाराशिव, अकोला, परभणी, जालना, नागपूर, अमरावती या सहा जिल्ह्यांमधील सुमारे १२ लाख ८६ हजार १८५ शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम मिळणार आहे. या संबंधित जिल्ह्यातील पिक विमा धारक शेतकऱ्यांना ६१३ कोटी १९ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
नाशिक, जळगाव, नगर या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर सुनावणी झाली असून, येथील विमा कंपन्यांनी सोयाबीन, मका, बाजरी या पिकांचे दावे मान्य केले आहेत. यामुळे यासंबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम वितरित होईल असे चित्र तयार होत आहे.