महाराष्ट्रात बैलपोळा का साजरा केला जातो ? वाचा या सणाचे महत्व

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Bail Pola 2023 : श्रावण महिना म्हणजेच सणांचा महिना. श्रावण महिना हा हिंदू धर्मासाठी खूपच पवित्र मानला जातो. या महिन्यात हिंदू सनातनी लोक विविध सण साजरे करतात आणि या महिन्यात नॉनव्हेज खाणे, मद्यपान करणे वर्ज्य आहे.

या महिन्यांमध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसारखे हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाचे सण या महिन्यात साजरा होतात. याशिवाय श्रावण महिन्याची सांगता ही देखील एका महत्त्वाच्या सणाने होते. श्रावण महिन्याची सांगता नेहमी दर्श पिठोरी अमावस्याला होते.

आणि या दर्श पिठोरी अमावस्यालाच दरवर्षी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खूप मोठा सण आहे. या सणाला बैलाचे पूजन केले जाते, शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राब राब राबणाऱ्या बैलांप्रति पोळ्याला कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यांना या दिवशी कोणतेच काम लावले जात नाहीत.

कसा साजरा होतो बैलपोळा?

बैलपोळा हा सण शेतकरी आणि बैलाच्या प्रेमाच प्रतीक आहे. खरंतर हा सण बैलांचा आहे. यामुळे पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना सणासाठी निमंत्रण दिलं जातं. यानंतर पोळ्याच्या दिवशी बैलांना छान अशी अंघोळ घातली जाते. यानंतर मग त्यांना चारा आणि पाणी दिल जात. मग बैलाच्या खोंडाला हळद व तुपाने शेकले जाते. यानंतर मग बैलांना सजवले जाते.

बैलांच्या अंगावर नक्षीकाम केले जाते. त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते. वेगवेगळ्या रंगांनी बैलांना रंगवले जाते. बैलांची शिंगे रंगवले जातात. त्यांच्या गळ्यात घुंगराच्या माळा टाकल्या जातात, डोक्याला बाशिंग लावल जाते, शिंगांना बेगड बसवलं जात. बैलांचा सर्व साज हा नवा असतो.

ज्याप्रमाणे आपण सणाच्या दिवशी नवीन कापड घालतो तसेच या दिवशी बैलांना देखील नवी वेसण, नवा कासारा, अंगावर झूल टाकली जाते, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घातले जातात. बैलांना या पद्धतीने सजवून गावातील पारावर असलेल्या मंदिराभोवती बैलांना फिरवले जाते. मात्र हा पोळा फिरवताना सर्वप्रथम मानाची बैल जोडी फिरवली जाते.

त्यानंतर मग पोळा फुटतो आणि सर्व बैल जोड्या एकाच वेळी पोळा फिरवतात. बैलांना मंदिराभोवती पाच, सात किंवा 11 वेळा फिरवले जाते आणि पुन्हा त्यांना घराकडे आणले जाते. घराजवळ बैलांची पूजा केली जाते. खायला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. खानदेशातील ग्रामीण भागात आजच्या दिवशी घरोघरी खापराच्या पुरणपोळ्या केल्या जातात. या सणाची ही एक मोठी विशेषता आहे.

का साजरा होतो बैलपोळा?

हा प्रश्न अनेकांकडून विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर मात्र एका पौराणिक कथेत देण्यात आले आहे. पौराणिक कथेनुसार, प्रभू विष्णू यांनी जेव्हा कृष्ण रुपात धरतीवर जन्म घेतला. तेव्हापासूनच कृष्णाचे मामा कंस यांनी कृष्णाचे प्राण घेण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केलेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून परम परमात्मा श्रीकृष्ण भगवान यांच्या मामाश्रीने आपला भाचा कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. दरम्यान भगवान श्रीकृष्णांनी या राक्षसाचा वध दर्श पिठोरी अमावस्येला केला. श्रावण महिन्यातील पिठोरी अमावास्येला पोलासूर या राक्षसाचा भगवान श्रीकृष्णांनी वध केला असल्याने हा दिवस बैल पोळा म्हणून साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे.

Leave a Comment