Maharashtra Gharkul Yojana : आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल. या स्वप्नांसाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करत असतो. पण, प्रत्येकालाचं घराचे स्वप्न साकार करता येत नाही. अनेक असंघटित क्षेत्रातील कामगारांना आयुष्यभर मेहनत घेऊनही स्वतःचे घर साकारता येत नाही.
दरम्यान अशाच कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून सोलापूर येथे भव्य गृह प्रकल्प साकारला जात आहे.
कचरा उचलणारे, विडी कामगार, बांधकाम कामगार, वस्त्रोद्योग कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी या प्रकल्पात घरे उपलब्ध करून दिली जात आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील रे नगर येथे विकसित होत असलेला 365 एकर जागेवरील हा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प राहणार आहे.
या प्रकल्पात एकूण 833 इमारती तयार केल्या जाणार असून येथे तीस हजार घरे तयार होणार आहेत. 30,000 वन बीएचके घरांपैकी 15000 वन बीएचके घरांचे आज अर्थातच 19 जानेवारी 2024 ला लोकार्पण देखील होणार आहे.
विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण केले जाणार आहे. या प्रकल्पाची खासियत म्हणजे या प्रकल्पांतर्गत विकसित झालेल्या घरकुलांची मालकी ही महिलांची नावे राहणार आहे.
दरम्यान आज यासंबंधीत महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकुलाची चावी दिली जाणार आहे. यामुळे हजारो कामगारांचे खऱ्या अर्थाने आज स्वप्न पूर्ण होणार आहे.
विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील काम देखील जलद गतीने सुरू दुसऱ्या टप्प्यातील 15,000 घरे देखील लवकरात लवकर लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
आज या आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी सोलापुरात दाखल होणार आहेत.
याप्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल असावे हे देखील उपस्थित राहणार आहेत.