Maharashtra Government Scheme : गरजू लोकांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी महाराष्ट्रात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने देखील अनेक योजना सुरू केल्या आहेत.
यामध्ये अलीकडेच सुरू झालेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा देखील समावेश होतो. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
खरेतर सत्ता स्थापित केल्यापासून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने अनेक कौतुकास्पद निर्णय घेतलेले आहेत. वर्तमान सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.
यातील मुख्यमंत्री वयोश्री योजना ही एक कल्याणकारी योजना आहे. या अंतर्गत राज्यातील 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एक रकमी लाभ दिला जाणार आहे.
ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे हेतू हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
यामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. या अंतर्गत दिले जाणारे तीन हजार रुपये हे एकरकमी दिले जातील आणि ही रक्कम एकदाच मिळणार आहे.
चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर असे आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ही रक्कम वितरित केली जाणार आहे.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड / मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं-घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे सदर लाभार्थ्याला सादर करावी लागणार आहेत.
आवश्यक पात्रता
या योजनेच्या लाभासाठी फक्त महाराष्ट्रातील नागरिक पात्र राहतील. 31 डिसेंबर 2023 रोजी ज्या नागरिकांचे वय 65 वर्षे होईल ते या योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील लाभार्थी यासाठी पात्र राहणार आहेत.