Maharashtra Government Scheme : केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील शोषित आणि वंचित घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. मागासलेल्या समाजातील मुलांसाठी देखील शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणाला चालना दिली जात आहे. ज्याप्रमाणे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक लाभ पुरवला जात आहे त्याच धरतीवर या दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक लाभ पुरवला जात आहे.
या योजनेअंतर्गत धनगर समाजातील मुलांना बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जात आहे. या योजनेअंतर्गत धनगर समाजातील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 51 हजार रुपयाचा भत्ता दिला जात आहे. शिक्षणादरम्यान धनगर समाजातील मुलांना पैशांची निकड भासू नये यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
या योजनेमुळे या समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण सहजतेने पूर्ण होत आहे. परिणामी ही योजना खूपच लोकप्रिय ठरली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण या योजनेसाठी कोण पात्र राहणार, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करावा लागतो याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
योजनेचे स्वरूप कसय ?
या योजनेअंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी 51 हजार रुपयांपर्यंतचा भत्ता पुरवला जातो. यामध्ये भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता पंधरा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता 8 हजार रुपये असे एकूण 51 हजार रुपये दिले जातात.
खरंतर बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ज्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय विश्रामगृहात जागा मिळत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्याना लाभ दिला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना शासकीय विश्रामगृहात प्रवेश मिळालेला नाही अशाच विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. पण यासाठी सदर विद्यार्थी ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असने आवश्यक आहे.
तसेच त्याच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न २.५० लाख रुपयापेक्षा जास्त असता कामा नये. तसेच लाभार्थी विद्यार्थी हा 28 वर्षांपेक्षा अधिक वयाचा नसावा. शिक्षणात खंड पडला असेल अथवा मध्यावधी प्रवेश घेतला असेल असे विद्यार्थी देखील या योजनेसाठी पात्र ठरतील अशी माहिती संबंधितांनी दिली आहे.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
मिळालेल्या माहितीनुसार लाभार्थी विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, स्कूल मार्क पत्रके, बोनाफाइड प्रमाणपत्र, खाते क्रमांक, आयएफएससी कोड, एनआयसीआर कोडं यांसारखी काही महत्त्वाची कागदपत्रे लाभार्थ्यांना सादर करावी लागू शकतात.
अर्ज कुठं करणार?
या योजनेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतो. जे विद्यार्थी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी योजनेच्या अधिकृत स्वयं महाऑनलाइन संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.