Maharashtra Havaman Andaj : येत्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. आज सर्वत्र थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण आज बाहेर पडणार आहेत.
पर्यटन स्थळांवर आज मोठी गर्दी पाहायला मिळतं आहे. अशातच मात्र भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. भारतीय हवामान खात्याने नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने होणार असा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने होण्याची शक्यता आहे.खरेतर नोव्हेंबर महिन्याचा शेवट अवकाळी पावसाने झाला. शिवाय डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली.
त्यावेळी झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती आता व्यक्त होत आहे.
याशिवाय रब्बी हंगामातील कांद्याचे पीक देखील अवकाळी पावसामुळे प्रभावित झाले आहे.अवकाळी पावसाच्या फटक्याने आता कुठे रब्बी हंगामातील शेती पिके सावरत होती.
मात्र तोच राज्यातील हवामानात पुन्हा एक महत्त्वाचा आणि मोठा बदल पाहायला मिळत आहे.आता राज्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पाऊस बरसणारा असा अंदाज समोर आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. येत्या 48 तासात दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार आहे.
नव्या वर्षात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तीन ते सहा जानेवारी 2024 दरम्यान महाराष्ट्रातील कोकण आणि गोव्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रात पाच आणि सहा जानेवारीला अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. मराठवाड्यात मात्र पावसाची शक्यता नाहीये. मराठवाड्यात आणि विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज देण्यात आला आहे.
निश्चितच राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याने संबंधित भागातील शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान होण्याची शक्यता आहे.