Maharashtra Havaman Andaj : सध्या महाराष्ट्रात भर पावसाळ्यात उन्हाचे चटके बसत आहेत. देशात जून ते सप्टेंबर हा कालावधी मान्सूनचा असतो. मात्र जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांपैकी फक्त जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जवळपास सर्वच विभागात चांगल्या पावसाची हजेरी लागली होती.
जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. परंतु जून आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. या चालू ऑगस्ट महिन्यात तर गेल्या 122 वर्षात जेवढा पावसाचा खंड पडला नव्हता तेवढा खंड पडला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके अक्षरशा जळून खाक होऊ लागली आहेत.
अशा स्थितीत खरिपातील पिकांना आता मोठ्या पावसाची गरज भासू लागली आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसा संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या तीन विभागात जोरदार वारे, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. पण राज्यातील उर्वरित भागात प्रामुख्याने पावसाची उघडीप राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. मात्र आजही राज्यात कुठेच मोठा पाऊस पडणार नाही असे सांगितले जात आहे.
कारण की भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यासाठी कोणताच अलर्ट जारी केलेला नाही. यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस का होईना जोरदार पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांची भोळी भाबडी आशा पुन्हा एकदा निरर्थक ठरली आहे. दरम्यान आता सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस पडावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार आज राज्यातील 11 जिल्ह्यात जोरदार वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या 11 जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताच अलर्ट दिलेला नाही.