Maharashtra Havaman Andaj : यंदाची दिवाळी फक्त सात दिवसांवर येऊन ठेपली आहे. दहा नोव्हेंबर रोजी धनतेरस आणि या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होणार आहे. 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत यावर्षी दिवाळीचा सण संपूर्ण देशात सेलिब्रेट होणार आहे.
खरंतर दिवाळीच्या पूर्वीच राज्यात थंडीची चाहूल लागत असते. महाराष्ट्रात दरवर्षी दिवाळीपूर्वी कडाक्याच्या थंडीला सुरुवात होते. यावर्षी देखील थंडीची चाहूल लागली आहे. मात्र थंडीची तीव्रता म्हणावी तशी अजूनही महाराष्ट्रात पाहायला मिळत नाहीये.
सकाळी जरूर थंडीचे वातावरण पाहायला मिळते मात्र दुपारी कडक ऊन पडत असल्याने हिवाळ्याची जाणीव अजूनही होत नाहीये. अशातच आता भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील 48 तास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे महाराष्ट्रात हिवाळा सुरू झाला आहे की हिवसाळा सुरू झाला आहे असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे. शेतकरी बांधव मात्र हिवाळ्यात का होईना, अवकाळी कां होईना पण पाऊस बरसला पाहिजे असे म्हणतं आहेत.
याचे कारण म्हणजे यंदा पावसाळी काळात खूपच कमी पाऊस झाला आहे यामुळे आगामी काळात गुराढोरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. यामुळे अवकाळी पाऊस जर झाला तर पाण्याचे हे संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे.
अशातच आता हवामान खात्याने आगामी 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असून हवेत गारठा वाढला असल्याने राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज सार्वजनिक केला आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील गारठा वाढला आहे.
याचा परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये पुढील 48 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर मध्ये बर्फवृष्टी होऊ शकते असे देखील आयएमडीने सांगितले आहे.
कोणत्या राज्यात बरसणार वरूणराजा ?
हवामान खात्याने सांगितले की, गेल्या 24 तासात अंदमान निकोबार बेट केरळ आणि तमिळनाडू या भागात चांगला पाऊस झाला आहे. केरळ आणि तामिळनाडू मध्ये आगामी काही दिवस पावसाची शक्यता कायमच आहे.
विशेष म्हणजे पुढील ७ दिवस दक्षिण द्वीपकल्पीय भागात हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, किनारी कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असे या संस्थेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. लक्षद्वीप, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात देखील पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
छत्तीसगड आणि ओडिशा राज्यातील काही भागात पाऊस होणार अस सांगितलं जात आहे. पश्चिम हिमालयातही आज हलका पाऊस आणि काही ठिकाणी बर्फवृष्टी होईल असे सांगितल जात आहे.
महाराष्ट्रात कुठे बरसणार पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आपल्या राज्यातही पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. पुढील 48 तास राज्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे.
याशिवाय गोव्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाचा जोर खूपच कमी राहणार आहे. या कालावधीत फक्त हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे.