Maharashtra Havaman Andaj : गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी देखील अवकाळी पाऊस झाला होता.
नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. याचा परिणाम म्हणून राज्यातील रब्बी हंगामातील पिकांना अगदी सुरुवातीच्या काळातच मोठा फटका बसला.
विशेष म्हणजे या नवीन वर्षाची सुरुवातही अवकाळी पावसाने झाली. यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना मोठा फटका बसला असून यामुळे उत्पादनात घट येऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे ढगाळ हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे राज्यातुन ऐन थंडीच्या दिवसातच थंडीचा जोर कमी झाला आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील हवामाना संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यातील अवकाळी पावसाचे सत्र थांबले आहे. अवकाळी पावसाने उघडीप दिली आहे पण राज्यातील किमान तापमानातील वाढ अजूनही कायमच आहे. मात्र आता राज्यातील किमान तापमानात देखील घट होणार आहे.
यामुळे हळूहळू थंडीचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात राज्यातील किमान तापमानात चार ते पाच अंशाची घट होणार आहे. सध्या राज्यातील किमान तापमान 14 ते 24°c दरम्यान आहे.
यामुळे थंडीचा जोर काहीसा कमी पाहायला मिळत आहे. पण आता लवकरच थंडीचा जोरही वाढणार आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती विरून जाताच राज्यातील पावसाची परिस्थिती पूर्णपणे निवळली आहे.
पण काल राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळाली आहे. मात्र आता ही परिस्थिती आजपासून बदलणार आहे.
आजपासून मुख्यतः निरभ्र आकाशासह किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आय एम डी च्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
यामुळे थंडीचा जोर वाढेल आणि रब्बी हंगामातील पिकांना पोषक हवामान तयार होईल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे गहू आणि हरभरा पिकाच्या वाढीसाठी चांगले पोषक वातावरण तयार होणार आहे.