Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने महाराष्ट्रातील नागरिकांना यंदाची दिवाळी अवकाळी पावसातच साजरी करावी लागली आहे.
राज्यातील प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील नागरिकांना अवकाळी पावसात दिवाळीचा सण साजरा करावा लागला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे दिवाळीनंतरही महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरूच राहणार असे चित्र तयार होत आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढली आहे. विशेषता ज्या शेतकऱ्यांचे भात पीक अंतिम टप्प्यात आहे अशा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अवकाळी पावसामुळे काढणीसाठी तयार झालेल्या भात पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय, तूर सोयाबीन कापूस यांसारख्या इतरही पिकांवर या अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम होणार आहे.
तथापि हा पाऊस येत्या रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरणार आहे. ज्या भागात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी हा पाऊस जीवदान देणारा राहणार आहे.
आता किती दिवस पाऊस बरसणार
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम म्हणून 14 नोव्हेंबर पासून आता पावसाचा नवा टप्पा सुरू होणार आहे.
याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस बरसणार आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार या हवामान प्रणालीमुळे गेल्या 24 तासांत तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आली आहे.
तसेच आगामी काही तासात दक्षिण भारतातील अनेक भागांत पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई , पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टी भागात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज आहे.