Maharashtra Havaman Andaj : अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाला तेज असे नाव देण्यात आले असून आज या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे आज 22 ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
आज संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करणार असल्याचे सांगितले जात आहे. हे चक्रीवादळ आज रविवार, 22 ऑक्टोबर रोजी तीव्र होणार असा अंदाज आहे. तसेच हे वादळ ओमान आणि शेजारील येमेनच्या दक्षिण किनार्याकडे सरकण्याची शक्यता देखील हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान या चक्रीवादळाचा देशातील कोणत्या राज्यांवर विपरीत परिणाम होणार, महाराष्ट्रातील हवामानात यामुळे मोठा बदल होईल का, राज्यात या चक्रीवादळाचा काही परिणाम पाहायला मिळणार आहे का? याविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तेज चक्रीवादळाचा देशावर काय परिणाम होणार ?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या या नवीन चक्रीवादळामुळे दक्षिण-पश्चिम अरबी सागरात समुद्रापासून ते उच्च समुद्राच्या स्थितीपर्यंत खराब परिस्थिती बनली आहे. याचा परिणाम म्हणून 22 आणि 23 ऑक्टोबरला अत्यंत वादळी परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आयएमडीच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
IMD ने असे म्हटले आहे की, या चक्रीवादळाचा गुजरात राज्यावर कोणताच परिणाम होणार नाही. आपल्या महाराष्ट्राला देखील या चक्रीवादळाचा कोणताच धोका नाहीये. पण चक्रीवादळामुळे 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी देशातील काही राज्यांमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून देशातील केरळ राज्यात 23 आणि 24 ऑक्टोबरला वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच 24 ऑक्टोबरला ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र या चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे बोलले जात आहे.