Maharashtra Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीसह धुक्याची दाट चादर पसरलेली आहे.
अशातच मात्र आता हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यात आता ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे खरीप हंगामातील हरभरा आणि गहू पिकावर याचा मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने 7 जानेवारी पर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे. या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस बरसणारा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागासोबतच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस बरसणार अशी शक्यता आहे.
आगामी सहा दिवस महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रात देखील या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात व आजूबाजूच्या परिसरात या कालावधीमध्ये अवकाळी पावसाची शक्यता देण्यात आली आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भातील बुलढाणा, वर्धा, अमरावती -परतवाडा, नागपूर, या भागात या कालावधीत जोराचा अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सतर्क राहून आपली कामे करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
तथापि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे यामुळे तेथील शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याचे कारण नाही असे देखील त्यांनी नमूद केले आहे.