Maharashtra Havaman Andaj : उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड हवेचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रातील हवामानातही मोठा अमुलाग्र बदल पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या 24 तासात राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
वीकेंडला अवकाळी पाऊस बरसणार असल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढणार आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमान घटणार आहे. मात्र असे असले तरी उद्यापासून पुन्हा एकदा राज्यातील गारठा वाढणार आहे.
दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने सदर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आपल्या रब्बी हंगामातील शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
खरे तर गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शिवाय या चालू वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली आहे. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे झाले आहे.
त्यामुळे रब्बी हंगामातील अंतिम अवस्थेत असलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात थंडीचा चांगला जोरही पाहायला मिळाला.
याचा परिणाम म्हणून राज्यातील गहू हरभरा यांसारख्या पिकांना चांगले पोषक हवामान तयार झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे हरभरा आणि गहू पिकाचे नुकसान होऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे.
अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय छत्रपती संभाजीनगरसाठीही आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरसाठी आज येल्लो अलर्ट जारी झाला आहे.