Maharashtra Michang Cyclone : आजपासून डिसेंबर महिन्याला सुरवात होत आहे. मात्र डिसेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे. राज्यात गेल्या पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस सुरूच राहणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. खरे तर राज्यात 25 नोव्हेंबर पासून पावसाला सुरुवात झाली आहे.
26 नोव्हेंबरला तर राज्यातील उत्तर महाराष्ट्रात गारपीट झाली होती. गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान हवामान खात्याने 28 तारखेनंतर राज्यातील हवामान पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल असा आशावाद व्यक्त केला होता.
पण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने आगामी काही दिवस राज्यात पाऊस सुरूच राहणार असल्याचे आय एम डी ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. वास्तविक, आता डिसेंबर महिना सुरू झाला आहे. डिसेंबर सुरू होताच राज्यासह देशातील विविध भागांमध्ये थंडीचा कडाका वाढू लागतो.
यानुसार राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये सध्या थंड वारे वाहत आहेत. शिवाय येत्या काही दिवसांत दिल्लीत थंडी आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पण आपल्या महाराष्ट्रात अजूनही थंडीची तीव्रता वाढलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे.
अशातच आता हवामान खात्याने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा एकदा हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोबतच देशातील पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता असल्याचे IMD ने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाला मिचांग असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चक्रीवादळाचा प्रभाव देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसून येत आहे. या नव्याने तयार झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे.
तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी पावसामुळे चेन्नईत जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी अतिवृष्टी सूरु असल्याने गुरुवारी शाळा बंद ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. जस की आपणास ठाऊकच आहे की, बंगालच्या उपसागरात हामून आणि मिथिली चक्रीवादळ आले होते.
म्हणजे हे नवीन वादळ या हंगामातील तिसरे चक्रीवादळ ठरले आहे. या नवीन वादळाचा मात्र देशातील दक्षिणेकडील राज्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील महत्वाची माहिती दिली आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत देशातील काही राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असे स्कायमेट ने आपल्या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.
तसेच जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, मुझफ्फराबाद आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे या संबंधित भागातील सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.