Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये रस्ते विकासाचे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. राज्यात समृद्धी सारख्या हायटेक महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून हा महामार्ग जुलै 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे.
सध्या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे 625 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणखी एक नवीन महामार्ग विकसित केला जाणार आहे.
हा महामार्ग 4217 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे जाळे विकसित करण्याच्या परियोजनेचा एक भाग राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य रस्ते विकास महामंडळ राज्यात पुणे ते नाशिक या दोन शहरादरम्यान नवीन औद्योगिक महामार्ग तयार करणार आहे.
मुंबई, पुणे आणि नाशिक हे 3 शहरे महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखली जातात. मात्र सध्या स्थितीला नाशिक ते पुणे आणि पुणे ते नाशिक हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
शिवाय या दोन्ही शहरा दरम्यान अजूनही थेट रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही. परिणामी या दोन शहरांदरम्यानचा प्रवास सध्या स्थितीला खूपच आव्हानात्मक बनला आहे. आता मात्र लवकरच हा प्रवास जलद होणार आहे.
कारण मुंबई ते पुणे दरम्यान 213 किलोमीटर लांबीचा औद्योगिक महामार्ग तयार केला जाणार आहे. या महामार्गामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक हे तीन जिल्हे परस्परांना जोडले जाणार आहेत.
यामुळे पुण्यातील नागरिकांना राजगुरुनगर, चाकण, मंचरमार्गे थेट शिर्डीला जाता येणार आहे. या महामार्गामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमधील उद्योग, शिक्षण, कृषी, पर्यटन अशा विविध क्षेत्राला मोठी उभारी मिळणार आहे.
औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. परिणामी राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे.
कसा असणार रूट ?
या महामार्गाच्या रोड मॅप बाबत बोलायचं झालं तर हा रस्ता राजगुरुनगर चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर मार्गे शिर्डीला जाणार असल्याने पुणेकरांना जलद गतीने श्रीक्षेत्र साईनगरी शिर्डीला पोहोचता येणार आहे.
हा मार्ग तीन टप्प्यांमध्ये विकसित होणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 213 किलोमीटर एवढी राहणार असून यासाठी 20,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.