Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात महामार्गांचे जाळे तयार झाले आहे. विशेष म्हणजे अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरू आहेत. काही महामार्गांची कामे नजीकच्या काळात पूर्ण होणार आहेत. आपल्या राज्यातील काही महामार्गाची कामे देखील आता अंतिम टप्प्यात आली आहेत.
यातीलच एक महामार्ग म्हणजे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग. हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू असून या मार्गाचा बाकी राहिलेला ७६ किलोमीटर लांबीचा अर्थातच इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा ऑगस्ट 2024 मध्ये सुरू होणार आहे.
एकंदरीत समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय पुणे ते बेंगलोर दरम्यानही द्रुतगती महामार्ग विकसित केला जात आहे. हा सातशे किलोमीटर लांबीचा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील बारा जिल्ह्यांना जोडणार आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक हे दोन राज्य जोडणारा हा महामार्ग भारतमाला परियोजने अंतर्गत विकसित होत आहे. या महामार्गामुळे पुणे ते बेंगलोर हा 18 तासांचा प्रवास अवघ्या 7 तासांवर येणार आहे. महाराष्ट्रातील तीन आणि कर्नाटकातील नऊ जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
मुंबई, पुणे आणि बेंगलोर या शहरांदरम्यानची रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारणे हा या मार्गाचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील अंतर 95 किलोमीटरने कमी होणार आहे.
या महामार्गासाठी अंदाजे 50 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग सहा पदरी राहणार आहे मात्र भविष्यात तो आठ पदरी बनवला जाऊ शकतो. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर यावर 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावू शकतात.
या महामार्गाचे सध्या स्थितीला 72 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून समोर आली आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग त्याच्या नियोजित वेळेतच अर्थात 2028 मध्ये पूर्ण होईल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे.
हा मार्ग महाराष्ट्रातील पुणे रिंगरोडपासून सुरू होणार आहे पुढे पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमधून कर्नाटकात प्रवेश करणार आहे. हा मार्ग कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बंगळुरू ग्रामीण या जिल्ह्यांमधून जाणार आहे.