Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध महामार्ग तयार केले जात आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित होत आहे. या 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
हा संपूर्ण महामार्ग जुलै 2024 पर्यंत सुरू होईल अशी आशा आहे. याशिवाय नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तिपीठ महामार्गासाठीच्या भूसंपादनाचे काम देखील सुरू झाले आहे.
शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा दरम्यान विकसित होणार असून याची लांबी 805 किलोमीटर एवढी राहणार आहे. तसेच महाराष्ट्रात आणखी एक महत्त्वाचा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात कल्याण ते लातूर दरम्यान एक नवीन मार्ग विकसित होणार आहे. या महामार्गामुळे कोकण आणि मराठवाडा हे दोन महत्त्वाचे विभाग परस्परांना जोडले जाणार आहेत. दरम्यान, आता आपण कल्याण ते लातूर हा महामार्ग नेमका कसा राहणार ? हे थोडक्यात पाहणार आहोत.
कसा राहणार नवीन मार्ग ?
सध्या स्थितीला कल्याण ते लातूर हा 450 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी दहा तासांपेक्षा अधिकचा कालावधी खर्च करावा लागत आहे. हेच कारण आहे की, राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण ते लातूर हे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी नवीन महामार्ग बांधण्याची संकल्पना मांडली आहे.
हा मार्ग कल्याण येथून सुरू होईल. पुढे हा मार्ग माळशेज घाटात प्रवेश करेल. माळशेज घाटात या प्रकल्प अंतर्गत आठ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाईल. या बोगद्याने पुढे अहमदनगरला जाता येईल.
मग तेथून पुढे बीड, मांजरसूंबा, अंबेजोगाईवरून लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत हा महामार्ग संपणार आहे. या मार्गामुळे कल्याण ते लातूर हा प्रवास चार तासात पूर्ण होईल. म्हणजेच प्रवाशांचा सहा तासांचा कालावधी वाचणार आहे.
एवढेच नाही तर हा महामार्ग मुंबई शहर आणि उपनगरांना सुद्धा कनेक्ट होणार असून यासाठी हा महामार्ग विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गीकेला जोडला जाणार आहे. अटल सेतुवरून पुढे बहुउद्देशीय मार्गिकेवरील कल्याण आंतरबदल मार्गाने या द्रुतगती महामार्गावर जाता येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
या महामार्गासाठी ५० हजार कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाचा प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव आता सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर या मार्गाचे संरेखन, आराखडा इत्यादी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. या मार्गामुळे मराठवाड्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे.