Maharashtra New Expressway : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्णत्वास गेली आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. समृद्धी महामार्ग हा देखील असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान तयार होत असलेला हा समृद्धी महामार्ग राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.
विदर्भातील जनतेला जलद गतीने राजधानी मुंबईत पोहोचता यावे यासाठी हा महामार्ग तयार केला जात आहे. सध्या स्थितीला या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरु आहे. या मार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम देखील लवकरच पूर्ण होणार अशी माहिती समोर येत आहे.
एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाचा विस्तारीकरणासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. समृद्धी महामार्गाची जोड आता मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला देखील मिळणार आहे.
यासाठी जालना ते नांदेड असा नवीन समृद्धी महामार्ग तयार होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, समृद्धी महामार्गाला मराठवाडा विभागातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली हा भाग जोडला जावा, अशी मागणी माजी मंत्री व भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी केली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना त्यांनी ही मागणी केली होती. दरम्यान अशोक चव्हाण यांची ही मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे. कारण की जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गासाठी मागवलेल्या निविदा शुक्रवारी खुल्या करण्यात आल्या आहेत. म्हणजेच या महामार्गाचा एक महत्त्वाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे.
साहजिकच यामुळे अशोक चव्हाण यांची स्वप्नपूर्ती होत असल्याचे म्हटले जात आहे. यावर माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी आनंद देखील व्यक्त केला आहे. दरम्यान आज आपण अशोक चव्हाण यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट नेमका आहे तरी कसा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे जालना-नांदेड समृद्धी महामार्ग
या महामार्ग प्रकल्प अंतर्गत 180 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार असून यामुळे मराठवाड्यातील विकासाला चालना मिळणार अशी आशा आहे. हा एक सहा पदरी महामार्ग राहणार आहे.
या महामार्गामुळे जालना, नांदेड, परभणी, हिंगोली हे जिल्हे एकमेकांना कनेक्ट होणार आहेत. या महामार्ग प्रकल्पामुळे मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने मुंबईत पोहोचता येणार आहे. जालना-नांदेड द्रुतगती मार्ग समृद्धी महामार्गावर जालना येथून सुरू होतो आणि नांदेड-देगलूर-तेलंगणा NH 161 वर समाप्त होतो.
हा मार्ग परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून जातो. खरे तर सध्या नांदेड ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 11 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय. परंतु जेव्हा जालना नांदेड समृद्धी महामार्ग विकसित होईल तेव्हा नांदेड मधील नागरिकांना अवघ्या सहा तासात मुंबईत पोहोचता येणार आहे.